Lonavala News : पवना धरणात बुडून युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पवना धरणात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा आज धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी (11 जुलै) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात घडली.

शुभम सुरेश दुधाळ (वय 21, रा. राजीव ग‍ांधी नगर खडकी पुणे) असे या बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. शुभम त्याचा भाऊ संकेत व सहा मित्रासोबत रविवारी सकाळी तुंग येथे फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पवना धरणात पोहण्यासाठी उतरले असता पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने अनेक जण मदतीसाठी धावून गेले मात्र पोहता येत नसल्याने काहीच उपयोग झाला नाही.

या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक युवक रोहित (छोट्या) जाधव, अक्षय उंबरकर, रमेश गोणते, तानाजी घारे यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले व दोन तासांनी बुडालेल्या तरूणाला बाहेर काढण्यात यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.