Lonavala : लोणावळ्यात 12 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन

एमपीसी न्यूज – अनेक गाड्यांचा लोणावळा स्थानकावरील थांबा बंद केल्याच्या ( Lonavala) तसेच पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याच्या मागणीसाठी 12 जानेवारी रोजी लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले जाणार आहे.

करोना साथ येण्यापूर्वी लोणावळा रेल्वे स्थानकावर अनेक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात होता. मात्र करोना कालावधीत अनेक गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला. करोना कालावधीपूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तसेच करोना कालावधीपूर्वी लोणावळा-पुणे दरम्यान लोकलच्या 48 फेऱ्या सुरु होत्या. त्या करोना कालावधीनंतर कमी करण्यात आल्या आहेत. या लोकल फेऱ्या नियमित सुरु कराव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. लोकल फेऱ्या कमी केल्यामुळे शहरातील नागरिक, विद्यार्थी यांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.

Maval : मावळमध्ये महायुतीत रस्सीखेच, खासदार बारणे आणि अजितदादांच्या आमदारांमध्ये जुंपली

लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. देशातील 75 रेल्वे स्थानकांचा अमृत योजनेंतर्गत विकास केला जाणार आहे. त्यात लोणावळा रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. जर इथे रेल्वे थांबणार नसतील. लोकल फेऱ्या वाढणार नसतील तर स्थानकाचे रुपडे पालटून उपयोग काय, असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर 12 जानेवारी रोजी नागरिकांकडून सकाळी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी लोणावळा शहर बंद ठेवण्याची हाक नागरिकांनी दिली ( Lonavala) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.