Lonavala : शिवराज्यभिषेक सोहळा महानाट्य 23 डिसेंबरला लोणावळ्यात रंगणार !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास व शिवराज्याभिषेक सोहळ्याचा क्षण येत्या 23 डिसेंबर रोजी मावळवासीयांना महानाट्याच्या रुपात अनुभवायला मिळणार आहे. लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व प्रवीण देशमुख निर्मित, लिखित व दिग्दर्शित भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा ह्या महानाट्याचे आयोजन रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ व लोणावळा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक मुकेश परमार व बाळासाहेब कडू यांनी लोणावळा शहरात केले आहे.

एक हजार कलाकार, शंभर फुटांचा भव्य तीन मजली रंगमंच, रंगमंचावर प्रत्यक्ष घोडे, उंट, बैलगाड्या, जिवंत तोफा, आक्रमक लढाया, नगारखाना, मेघडंबरी, छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा हे या नाट्याचे प्रमुख आकर्षण राहणार असून नाट्यामध्ये गणेशवंदना, कोळीनृत्य, गोंधळ, पोवाडे, धनगरनृत्य, वाघ्यामुरळी, लावणी, मर्दानी खेळ, ढोलताशा आदींचा समावेश असणार असल्याची माहिती या महानाट्याचे निर्माते प्रवीण देशमुख व रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ यांनी दिली. सदरच्या महानाट्यात सिनेअभिनेता चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवरायांची मुख्य भूमिका बजावणार अाहेत.

या नाट्याकरिता लोणावळ्यातील पुरंदरे शाळेच्या मैदानावर भव्य दिव्य रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. सदर महानाट्याची निर्मिती ही लोणावळा शहरात झाली असून पहिला प्रयोग देखील लोणावळा शहरातच होत असल्याने नागरिकांची शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सर्वांना हे महानाट्य विनामूल्य पहाता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.