Chinchwad News : शहरात प्रथमच रंगणार राज्यस्तरीय महालावणी स्पर्धा

चिंचवडमध्ये 25, 26 मार्च रोजी रंगणार लावणी महोत्सव;आमदार उमा खापरे, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांची माहिती

एमपीसी न्यूज : लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य महालावणी स्पर्धा होणार आहे. एका पेक्षा एक जबरदस्त लावण्या पाहण्याची संधी शहरातील रसिक प्रेक्षकांना मिळणार असून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.(Chinchwad News)  स्पर्धेतील पहिले पारितोषिक 1 लाख रुपयांचे असणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राची लावणीची परंपरा जपणाऱ्या कलाकारांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. 

 

याबाबतची माहिती आयोजक आमदार उमा खापरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी रविवारी (दि.19) पत्रकार परिषदेत दिली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यावेळी उपस्थित होत्या. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 25 आणि 26 मार्च 2023 रोजी महालावणी स्पर्धा होणार आहे. 25 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 9 असा कार्यक्रम चालणार असून सर्वांना विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कथक नर्तक डाॅ. पं.नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते होणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह उपस्थित असणार आहेत.

 

26 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता लुप्त होत चाललेला ‘सवाल जवाब’ हा कार्यक्रम आणि अंतिम फेरी होणार आहे. परीक्षक सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघना एरंडे करणार आहेत.

 

Pune News : शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी लावणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. लावणी महोत्सव पाहण्यासाठी महिला बचत गटांना मोफत पास दिले जाणार आहेत. महाराष्ट्राची लोककला जपण्याचे काम आम्ही करत आहोत. लावणीची परंपरा जपणे आवश्यक आहे”.

 

सुलभा उबाळे म्हणाल्या, “सुरेखा पुणेकर यांनी लावली जपली. लावणीसाठी आयुष्य दिले. सातासमुद्रापार लावणी पोहोचवली. कोरोना काळात लावणी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती.(Chinchwad News)  लावणीच्या नावावर होणाऱ्या नृत्यांमुळे पारंपरिक लावणी कलाकरांवर अन्याय होत आहे. खऱ्या कलाकारांना कोणी विचारत नाही. खऱ्या कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे”.

 

 

 

लावणीची विटंबना होतेय

 

आता लावणी नव्हे ‘डीजे शो’ चालला आहे. लावण्याचे व्यवस्थित सादरीकरण होत नाही. पारंपरिक बाज ठेवला जात नाही. आता लावणीचे सादरीकरण करणारे शिकायला तयार नाहीत. लावणीची विटंबना होत असताना मनाला दुःख वाटत असल्याची खंत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली.

 

लावणी कशी असते ही दाखविण्याची वेळ आली आहे. ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते पोट भरत असल्याचे सांगत गौतमी पाटील यांच्यावर बोलताना अंगभर कपडे घालून लावणीचे सादरीकरण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वयाच्या आठव्या वर्षी मी या क्षेत्रात आले. शाळा मला माहिती नाही.(Chinchwad News) लावणीसाठी मी योगदान दिले. लावणी लोक बघत नव्हते. महिला पुरुषांना लावणी पाहण्यासाठी पाठवत नव्हते. मी लावणी परदेशापर्यंत पोहोचवली. लावणीने मला घडविले. लावणी टिकली पाहिजे. महिलांनी बघितली पाहिजे, असेही पुणेकर म्हणाल्या.

 

बक्षीसांची बरसात!

 

स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक संघाला 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाणार असून आतापर्यंत 15 संघांची नोंदणी झाली आहे. स्पर्धेत प्रथम येणा-या संघाला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय 71 हजार, तृतीय 51 हजार आणि उत्तेजनार्थ 31 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ठ लक्षवेधी लावणी नृत्यांगना, उत्कृष्ठ  ढोलकी वादक, उत्कृष्ठ  गायिका, गायक, उत्कृष्ठ  पेठी वादक यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

 

लावणी जपणाऱ्या कलाकारांचा विशेष पुरस्काराने गौरव!

 

आजपर्यंत लावणी कला जपली, जोपासली. या कलेसाठी आपले सर्व आयुष्य दिले. नखशिखांत सादरीकरण करत महाराष्ट्राची लावणीची परंपरा जपणाऱ्या आणि ज्यांची उपजीविकाच लावणी आहे अशा कलाकारांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. (Chinchwad News) त्यामध्ये लीला गांधी, संजीवनी मुळे नगरकर, माया जाधव, सीमा पोटे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर, भारत सरकारचा मानाचा संगीत नाटक अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ. पं.नंदकिशोर कपोते यांचा शहराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.