Maharashtra : फोन टॅपिंग प्रकरणात क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक

एमपीसी न्यूज – फोन टॅपिंग प्रकरणात (Maharashtra) क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर वर्णी लागली आहे. त्या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. रजनीश सेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्य सरकारने मंगळवारी (दि. 3) पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या. पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे डिसेंबर 2023 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे रिक्त झालेल्या पोलीस महासंचालक पदावर 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी त्यांच्यावर मुंबई येथे कुलाबा आणि पुणे शहरात एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही कारवाई करण्यात आली होती.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुण्यातील गुन्ह्याच्या प्रकरणात (Maharashtra) पोलिसांनी ‘सी समरी रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला होता. सी समरी रिपोर्ट म्हणजे ‘गैरसमजुतीने दिलेली फिर्याद’. अशा प्रकारचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता.

Pune : पुनीत बालन यांना पुणे महापालिकेचा दणका; तब्बल 3 कोटी 20 लाखांचा दंड

तर मुंबई येथील प्रकरणात त्यांच्या विरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील दोन्ही एफआयआर रद्द केले होते. त्यामध्ये शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली होती.

दरम्यान, रश्मी शुक्ला दिली येथे प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या. किशोरराजे निंबाळकर यांची 26 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

त्यांच्या नियुक्तीमुळे एमपीएससीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले होते. निंबाळकर हे बुधवारी सेवानिवृत्त होणार असल्याने हे पद रिक्त झाले. एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासाठी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी शासनाकडे अर्ज केला होता.

रजनीश सेठ यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वन सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार या तिघांच्या नावांची अंतिम यादी राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य शासनाकडे पाठवली होती.

त्यातून रजनीश सेठ यांची एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रजनीश सेठ यांच्याकडे एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.