Maharashtra News : चक्क एकट्या बैलासमोर तास दोनतास नाचली गौतमी पाटील

एमपीसी न्यूज – पुणेकर खूप चांगले रसिक आहेत, हे आजवर ऐकलं, पाहिलं (Maharashtra News) होतं. पण पुणेकरांप्रमाणे इथले बैल देखील रसिक आहेत, असं म्हटलं तर… पण हे खरं आहे. मुळशी तालुक्यातील भूकुम गावातील बावऱ्या बैल त्याच्या रसिकतेसाठी अवघ्या राज्यात गाजतोय. बावऱ्याच्या मनोरंजनासाठी चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमाला गौतमी आली आणि ती बावऱ्या समोर देहभान हरपून तब्बल तास दोनतास नाचली देखील.

मुळशी तालुक्यातील सुशील हगवणे युवा मंच आणि मित्र परिवाराने घरातील विवाह सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी मंडळाने मोठे स्टेज उभारले. स्टेजच्या पुढे भलामोठा मोकळा परिसर होता. त्यामुळे या ठिकाणी काही हजार नृत्य शौकिनांची गर्दी होणार याची खात्री होती. ठरलेल्या वेळेप्रमाणे गौतमी पाटील कार्यक्रमासाठी तिच्या संपूर्ण लवाजम्यासह हजर झाली. तिने देहभान विसरून दहा- वीस मिनिटे नाही तर चांगला दोन तास कार्यक्रम केला. बहारदार गाण्यांवर तिने तिची अदाकारी देखील केली.

Ravet : मेंढ्यांच्या कळपातून चार मेंढ्या, एक बोकड चोरीला

या सगळ्यात विशेष काय, असा प्रश्न पडतो. पण गौतमीच्या या कार्यक्रमासाठी एकही माणूस प्रेक्षक म्हणून उपस्थित नव्हता. तिचा संपूर्ण कार्यक्रम पाहिला एकट्या बावऱ्या बैलाने. स्टेजसमोर बावऱ्याला दोन कासऱ्यांनी बांधले होते. शिंगे रंगवलेली, त्यावर गोंडे लावलेले, अंगावर गुलाल उधळलेला आणि गळ्यात हार घातलेल्या खैरा बांडा रंग असलेल्या खिलार बावऱ्याने गौतमीच्या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला.

बावऱ्याच्या या रसिकतेची आता राज्यभर चर्चा सुरु आहे. बावऱ्या हा शर्यतीत धावणारा बैल आहे. त्याने आतापर्यंत बैलगाडा शर्यतीत बक्षिसे देखील जिंकली आहेत. त्यामुळे बावऱ्या संपूर्ण गावचा लाडका बैल झाला आहे. त्यामुळेच की काय, आपल्या लाडक्या बावऱ्याच्या मनोरंजनासाठी चक्क गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात (Maharashtra News) आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.