Maratha Reservation : जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षणं प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न – खासदार उदयनराजे

एमपीसी न्यूज – जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यासाठी, राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत असून तेच नेते आता सत्तेत आहेत. अजून किती दिवस तुम्ही मराठा समाजाचा अंत पाहणार आहात, असा सवाल राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास यायला लागला आहे. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि राजकीय दृष्टिकोन ठेवायचा आणि एखाद्या समाजाला दाबायच काम केलं जात आहे. मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी छत्रपतींच्या विचाराने चालतो. ते सर्व धर्माला सोबत घेऊन चालायचे. आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी केवळं होणार, झालं असं आश्वासन दिलं जातं. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. प्रश्न सोडवता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरी बसा, अशा शब्दात त्यांनी आरोप केला आहे.

शरद पवार यांचं नाव न घेता सूचकपणे टीका करताना उदयनराजे म्हणाले, विश्वासघात झाला तर लोक तुम्हाला खाली खेचतील. तुमची इच्छा असेल तर हो म्हणा नाही तर लोक तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. क्रियेला प्रतिक्रिया झाली तर त्याला तुम्हीच जबाबदार असाल. आता कोरोनाचा काळ आहे म्हणून लोक घरात आहेत. जातीचं राजकारण कधीपर्यंत करणार समस्यांवर राजकारण करणार आहात की नाही.

देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केलं. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता तुम्ही सत्तेत आहात ना मग काम करा ना, असंही ते म्हणाले. जिल्हा न्यायालयातही तारीख देतात. मग सुप्रीम कोर्टाने तारीख दिली नाही. राज्य शासनाचा वकील हजर राहात नाही, असा आरोपही त्यांनी केला. इतरांना जसे आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं उदयनराजे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.