Maratha Reservation : सरकारच्या प्रयत्नांना मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे; मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीत ठराव

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलने(Maratha Reservation) केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 1) मुंबई येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सरकारच्या प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे, असा ठराव या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.

या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, (Maratha Reservation)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, जयंत पाटील, सुनील प्रभू, सुनील तटकरे, डॉ. प्रशांत इंगळे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष), राजेश टोपे, कपिल पाटील, प्रमोद पाटील, सदाभाऊ खोत, प्रा. जोगेंद्र कवाडे, रेखा ठाकूर, सुलेखा कुंभारे, डॉ. राजेंद्र गवई, गौतम सोनवणे, सचिन खरात, रवी राणा, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, संजय शिरसाट, राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, बाळकृष्ण लेंगे हे आमदार उपस्थित होते.

Pune : काञज येथील गोकुळ नगर येथे झोपड्यांना आग

सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरवात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते. त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे.

राज्यात ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापंसती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये. राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन या ठरावात करण्यात आले.

तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असेही सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या ठरावात म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.