BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट ” बोगदा ” वैचारिक भावनाप्रधान

INA_BLW_TITLE

(दीनानाथ घारपुरे)
एमपीसी न्यूज- जन्म आणि मृत्यू ह्या गोष्टी माणसाला चुकलेल्या नाहीत, जन्म झाला त्याचा मृत्यू हा होणारच, हे जीवनाचे रहाटगाडगे आहे. जन्म कधी आणि मृत्यू कधी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. पण आजकाल ” इच्छामरण ” ह्यावर अनेकदा बोलले जाते. इच्छामरण हा विषय संवेदनशील आहे, ह्याच विषयावर ” बोगदा ” ह्या चित्रपटाची निर्मिती फिल्मीदेश मराठी या चित्रपट संस्थेने केली असून प्रस्तुती नितीन केणी त्यांची आहे. निर्माते सुरेश पानमंद , नंदा पानमंद , करण कोंडे, निशिता केणी हे असूनकथा आणि दिगदर्शन निशिता केणी यांनी केलं आहे, या मध्ये सुहास जोशी, मृण्मयी देशपांडे, रोहित कोकाटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मुलगी तेजू आणि तिची आई ह्या दोघींची कथा यामध्ये मांडली आहे. चित्रपटाचा विषय / आशय हा इच्छामरणाचा असल्याने हा मनाला भावणारा आणि विचार करायला लावणारा असा आहे. ह्या विषयावर वैचारिक मतभेद आहेत, संवेदनशील विषय असल्याने चित्रपटाची गती हि धीर-गंभीर म्हणजे संथ आहे, हा सिनेमा स्वेच्छामरणावर भाष्य करतो.

आई मुलीची ही कथा मनाला चटका लावून जाते. तेजू नावाची मुलगी आपल्या आईचा सांभाळ करीत असते, तेजुला नृत्यकलेची आवड, पण ते तिच्या आईला आवडत नाही. ह्यावरून दोघांची नेहमी वादावादी होते. आई म्हातारी, तिला असाध्य असा आजार झालेला, त्या आजाराला ती कंटाळलेली असते, एक दिवस आईला बातमी कळते की दक्षिण भारतात एक असे गाव आहे कि त्या गावी गेल्यावर तेथील माणसे विनासायास – काही शारीरिक त्रास न होता, ते त्या व्यक्तीला सात दिवसात मृत्यू पर्यंत नेऊन पोहोचवितात. आई मुलीला सांगते कि मला त्या गावी घेऊन चल, ही माझी शेवटची इच्छा आहे, मला शरीराला यातना देत इथे मरायचे नाही. मला तिथे जाऊन मरण साजरे करायचे आहे.

आईची इच्छा तिची मुलगी ” तेजू ” पुर्ण करते का ? करते तर ती कश्या प्रकारे करते ? त्या प्रवासाला जाताना वाटेत काय अडचणी येतात, ? शेवटी आईला ” मोक्ष ” मिळतो का ? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे सिनेमात मिळतील.

आईची भूमिका सुहास जोशी यांनी अप्रतिम केली असून मृण्मयी देशपांडे हिने मुलीची भूमिका तोडीसतोड अशी रंगवली आहे. त्यांना साथ किशोरची भूमिका करणारे रोहित कोकाटे यांनी दिली आहे. नितीशा केणी यांनी हा सिनेमा दिगदर्शित केला असून चित्रपट खूप संथ आणि लांबलेला जाणवतो. गीत / संगीत चांगले आहे. छायाचित्रण हि ह्या चित्रपटाची महत्वाची बाजू फ्रेम आणि त्याला अनुसरून केलेली प्रकाश योजना परिणाम साधून जाते.

हा मानवी मनाचा बोगदा आहे. जन्मापासून – मृत्यूकडे नेणारा ,,, त्यावर विचार करायला लावणारा असा आहे. बोगदा मधून प्रवास करताना आजूबाजूला अंधार असतो, त्या प्रमाणे व्यक्तीची भावना झालेली आहे. प्रवास अंधारातून जात असला तरी पुढे त्यांना ” मोक्षा ” च्या प्रकाशाकडे वाटचाल करायची असते. असा हा बोगदा नेमका कसा भावेल ते प्रेक्षकच ठरवतील.

HB_POST_END_FTR-A4

.