Bhosari : नववधूच्या वेशात ‘ती’ने केली आत्महत्या

आत्महत्येपूर्वी आठ पानांची चिठ्ठी; चिठ्ठीत नव-याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला

एमपीसी न्यूज – मूल होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने पतीकडून वारंवार होणा-या छळाला कंटाळून विवाहितेने नववधूचा पेहराव करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री श्रीराम कॉलनी भोसरी येथे उघडकीस आली. विषारी औषध सिरिंजच्या माध्यमातून शरीरात टोचून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी या विवाहितेने आठ पानांची चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये तिने नव-याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

विद्या शैलेश पारधी (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. प्रेमविवाह झाला असल्याने ती आई-वडिलांपासून दुरावली होती. मूल होत नसल्याने सतत नव-यासोबत होणा-या भांडणामुळे ती तिच्या मैत्रिणीकडे राहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी विद्याचा शैलेश सोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी विद्याला मूल होणार नसल्याचे निदान झाले. यामुळे दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर लहान लहान कारणांवरून त्यांच्यामध्ये भांडण होऊ लागले. शैलेशला दारूचे व्यसन आहे. तो दारू पिऊन तिला वारंवार त्रास देऊ लागला. या त्रासाला विद्या पूर्णतः कंटाळली होती. प्रेम विवाह केल्याने ती आई-वडिलांपासून दुरावली होती. त्यामुळे ती माहेरी जाऊ शकत नव्हती. मागील काही दिवसांपासून ती शैलेशपासून वेगळी तिच्या मैत्रिणीकडे राहत होती. शनिवारी शैलेश बाहेरून घरी आला तेंव्हा त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याने बराच वेळ दरवाजा ठोठावला, परंतु आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्याने दरवाजा तोडला असता विद्या बेशुद्धावस्थेत सापडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आत्महत्या करताना विद्याने अंगावर सोन्याचे दागिने, लग्नातील शालू, हातावर मेहंदी, बिंदी असा नव्या नवरीचा पेहराव केला होता. आत्महत्येपूर्वी तिने आठ पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात लिहिले आहे की, ‘आई-बाबा मला माफ करा. आपल्यात का दुरावा आला हे तुम्हाला माहिती नाही. शैलेश तुम्ही दुसरा विवाह करा. पण तिला त्रास देऊ नका. दोघेजण सुखाचा संसार करा. माझं नशीबच खराब आहे. जमलंच तर माझी पण आठवण काढा.’

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.