Chikhali : स्पाईन रोडवर राजरोसपणे मटका अड्डा सुरु; पोलिसांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – चिखली येथे स्पाईन रोडवर राजरोसपणे मटका अड्डा चालवला जात आहे. मात्र, स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मटका अड्ड्यामुळे गुन्हेगारी मानसिकता वाढत असून गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गुलाब पान पाटील यांनी याबाबत चिखली पोलिसांना निवेदन दिले आहे. स्पाईन रोडवर भीमशक्ती नगर झोपडपट्टी येथे राजरोसपणे जुगार व मटका अड्डा सुरु आहे. मटका आणि जुगार अड्ड्यांवर गुन्हेगारी मानसिकतेच्या नागरिकांचा राबता असतो. या रस्त्यावरून महिला आणि शाळकरी मुलांची मोठी वर्दळ असते. या महिला आणि शाळकरी मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

जुगार अड्ड्यामुळे दादागिरी आणि गुंड प्रवृत्ती वाढत असून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राजरोसपणे सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर आळा घालून परिसरातील महिलांना त्रासमुक्त करावे. तसेच शाळकरी मुलांना येण्या-जाण्यासाठी भीतिमुक्त वातावरण तयार करावे. पुढील आठवडाभरात कारवाई न झाल्यास महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जुगार अड्डे बंद पाडण्यात येतील. असा इशारा देखील निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.