Maval : मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत पक्षाला जाहीर पाठिंबा – रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत मावळ विधानसभेकरिता अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांना साथ देण्याचे रवींद्र भेगडे यांनी जाहीर केले. दरम्यान, रवींद्र भेगडे यांची बाळा भेगडे यांच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली.

रवींद्र भेगडे म्हणाले की, मावळ विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता मी इच्छुक होतो, उमेदवारी मिळविण्याकरिता प्रयत्न केले. गावभेट दौरा व संघटना बांधणीकरिता काम केले मात्र पक्षाने राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त करत मी अपक्ष अर्ज दाखल केला होता मात्र अखेर मी भाजपाच्या व संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता असल्याने पक्ष शिस्तीला बांधिल राहून मी समर्थक कार्यकर्ते व नातेवाईक यांच्याशी चर्चा करुन निवडणुक न लढविता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहिर केले. पुढील पंधरा दिवस भाजपाचा उमेदवार विजयी करण्याकरिता सर्वशक्तीनिशी प्रचार प्रक्रियेत सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले.

कोणतीही अपेक्षा न ठेवता बिनशर्तपणे हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले. तसेच मावळ विधानसभेच्या प्रचारप्रमुख पदी रविंद्र भेगडे यांची निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रिपाईचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, संतोष दाभाडे, एकनाथ टिळे, कमलशील म्हस्के, शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, रघुवीर शेलार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.