Vadgaon Maval : सुनील ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग मुलांच्या संस्थेतील मुलांना धान्यवाटप

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ नगरपंचायतीचे नगरसेवक व सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक सुनील गणेशअप्पा ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 6) सामाजिक विषयांची सांगड घालत वेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत, फ्लेक्स बाजीचा अवास्तव खर्च कमी करून नायगाव येथील अस्थिव्यंग, अपंग मुलांची संस्था सोसायटी फाॅर एज्युकेशन ऑफ द क्लीपड या संस्थेमधील मुलांच्या सोबत केक कापून सुनील ढोरे यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना तांदूळ, गहू, ज्वारी, तेल, डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त मंगेश खैरे, युवा कार्यकर्ते विकी ढोरे सह सह्याद्री फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फळे व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

नगराध्यक्ष मयूर ढोरे व नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे प्रकल्प प्रमुख अशोक जाधव व सांगळे, पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सुनील ढोरे यांचे आभार मानले. अशाच प्रकारे इतरांनी आपला वाढदिवस गोरगरीब व अपंग विद्यार्थ्यांना मदत करून साजरा केल्यास वाढदिवस सार्थकी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सुनील ढोरे यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या व मदत केल्याबद्दल आभारही मानले.

सोसायटी फाॅर एज्युकेशन ऑफ द क्लीपड या संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अस्थिव्यंग झालेली मुले शिक्षणासाठी येतात. या मुलांना इयत्ता चौथीपर्यंत संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षण दिले जाते. इयत्ता पाचवीपासून ही मुले कान्हेफाटा येथील शाळांमधून शिक्षण घेतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.