Maval : पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी बाबुराव वायकर यांची निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ-वडगाव खडकाळा गटातील जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांची पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती निवड करण्यात आली. आज, शुक्रवारी (दि. 24) जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समिती आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचार समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड झाली आहे. अध्यक्ष पदासाठी मावळच्या सदस्या शोभा कदम यांना मिळण्याची शक्यता होती. मात्र त्यावेळी मावळच्या पदरी निराशा पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांपासून मावळला दुर राहावे लागले. असे असतानाही समितींच्या निवडीमध्ये बांधकाम समिती सभापती पद मावळला मिळावे अशी मागणी केली होती.मात्र, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदावर समाधान मानावे लागले आहे.

आज झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या निवडीत प्रमोद काकडे (बारामती) यांची बांधकाम व आरोग्य समिती, पूजा पारगे (हवेली) यांची महिला व बालकल्याण समिती, सारिका पानसरे (दौंड) यांची समाजकल्याण समिती आणि बाबुराव वायकर (मावळ) यांची कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या 52 वर्षांच्या इतिहासात मावळला स्वर्गीय दिलीप टाटीया व अतिष परदेशी यांच्या रूपाने अनुक्रमे बांधकाम व आरोग्य समिती आणि समाजकल्याण समिती सभापतीपदांची संधी मिळाली होती. त्यानंतर बाबुराव वायकर यांना कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी संधी मिळाली आहे.

बाबुराव वायकर हे पदवीधर असून ते मावळ तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी आहेत. प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. वडगाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंचपदही त्यांनी भूषविले आहे. शेतकरी असल्यामुळे त्यांना कृषी आणि पशु विभागाची जाण आहे. त्यांच्या माध्यमातून मावळ परिसरात पुणे जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबविल्या जातील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.