Maval : इंद्रायणी नदीत पडलेल्या अक्षयचा मृतदेह नऊ दिवसानंतर सापडला

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडा तोडून कार नदीपात्रात पडली. कारमधील तीन जणांपैकी एकजण पोहून बाहेर आला. तर दोघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. एकाचा मृतदेह कारसोबत काढण्यात आला. तर तिस-या तरुणाचा शोध पथकांना लागलाच नाही. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली होती. सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमला आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास इंद्रायणी नदीत घटनास्थळापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर तिस-या तरुणाचा मृतदेह सापडला.

अक्षय मनोहर जगताप (वय 21) असे नऊ दिवसानंतर मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. संकेत नंदु असवले (वय 20) असे कारसोबत मृतदेह काढलेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचा मित्र अक्षय संजय ढगे (वय 20) हा पोहून बाहेर आला.

स्विफ्ट डिझायर कारमधून अक्षय ढगे, संकेत असवले, आणि अक्षय जगताप हे तिघेजण गुरुवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास कान्हे फाट्याकडून टाकवे गावाकडे जात होते. संकेत असवले हा कार चालवत होता. इंद्रायणी नदीवर कार आली असता संकेतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात पडली. काही वेळेनंतर अक्षय ढगे या तरुण पोहून बाहेर आला. मात्र त्याचे दोन मित्र कारमध्येच अडकून राहिले.

घटनेची माहिती मिळताच टाकवे गावातील नागरिक नदीकडे धावत आले. दरम्यान, वडगाव मावळ पोलीस, एनडीआरएफच्या पथकांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आणि एनडीआरएफच्या पथकांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. एनडीआरएफ च्या जवानांनी दिवसभर नदीपात्रात कार शोधली. मात्र, दिवसभर कार सापडली नाही. आयएनएस शिवाजी लोणावळा येथील पथकाने पाणबुड्यांच्या सहाय्याने शोध घेतला. रात्री नऊच्या सुमारास कार शोधण्यात बचाव पथकाला यश आले. क्रेनच्या साहाय्याने कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये संकेत आसवले याचा मृतदेह आढळून आला. अजूनही अक्षय जगताप बेपत्ताच होता.

मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी तरुणाचा शोध घेतला. शोधकार्यात अडचणी आल्याने काही काळ शोधकार्य थांबवण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून बोट देण्यात आली. बोटीच्या साहाय्याने मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने अविरत अक्षयचा शोध घेतला. या शोध पथकाला आज सकाळी अकराच्या सुमारास अक्षयचा मृतदेह सापडला.

टाकवे बु. गावातील नागरिकांनी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला अक्षयचा मृतदेह शोधण्याची विनंती केली. गावक-यांनी टीमच्या राहण्याची व्यवस्था देखील केली. गावक-यांची तळमळ बघून टीमने अक्षयचा मृतदेह शोधण्यासाठी आणखी कसोशीने प्रयत्न केले. या प्रयत्नांना नऊ दिवसानंतर यश आले.

एका मित्राचा आज अंत्यविधी तर दुस-या मित्राचा उद्या दशक्रियाविधी; टाकवे गावावर शोककळा

कार नदीत पडल्याच्या अपघातात अक्षय आणि संकेत या दोघांचा मृत्यू झाला. संकेतचा मृतदेह अपघाताच्या दिवशीच कार सोबत पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र, अक्षयचा मृतदेह सापडला नाही. अखेर नऊ दिवसानंतर अक्षयचा मृतदेह सापडला. आज (शुक्रवारी) अक्षयचा अंत्यविधी होणार आहे. तर त्याचा मित्र संकेतचा दशक्रिया विधी उद्या (शनीवारी) होणार आहे. या दुःखद प्रसंगामुळे संपूर्ण टाकवे गाव आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.