Maval : नागरिकांच्या सतर्कतेमुळे घर सोडून निघालेला मुलगा सुखरूप घरी परतला

एमपीसी न्यूज – मामा-मामीच्या भीतीने 11 वर्षांच्या चिमुकल्याने घर (Maval) सोडले. पुणे-मुंबई महामार्गावर शिंग्रोबा घाटात मुलगा भटकत असताना त्याला एका एका टेम्पो चालकाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांच्या प्रयत्नांमुळे 11 वर्षांचा चिमुकला त्याच्या घरी सुखरूप पोहोचला.

शनिवारी (दि. 21) रात्री उशिरा अकरा वाजताच्या सुमारास राकेश दाभाडे (Maval)आणि सुरज दाभाडे जुना पुणे-मुंबई महामार्गाने जात होते. शिंग्रोबा घाटातून जात असताना एक टेम्पो चालक एका लहान मुलाला टेम्पोमध्ये बसवून नेत असल्याचे दिसले. राकेश आणि सुरज यांना संशय आल्याने त्यांनी त्या टेम्पोचा पाठलाग केला. पुढे गेल्यानंतर टेम्पो एका हॉटेल समोर थांबला. चालकाने मुलाला वडापाव खायला दिला. राकेश आणि सुरज यांनी मुलाकडे चौकशी केली असता तो घरातून निघून आला असल्याचे समजले.

Wakad : विनापरवाना कीर्तनाचा कार्यक्रम घेतल्या प्रकरणी शिवसेना उबाठा पक्षाच्या शहराध्याक्षांवर गुन्हा

टेम्पो चालकाला त्या मुलाला पोलीस ठाण्यात पोहोचवण्यास सांगितले. मात्र रस्त्यात पोलीस स्टेशन न लागल्याने टेम्पो कार्ला फाटा येथे थांबला. दाभाडे यांनी मुलाला आपल्या गाडीत घेतले आणि त्याला वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी मुलाची माहिती घेऊन त्याला लोणावळा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले. मध्यरात्री लोणावळा पोलीस ठाण्यात जाणे शक्य नव्हते.

त्याच वेळी तो मुलगा ‘मला घरी जायचे नाही. मला तुमच्या घरी घेऊन चला. मला आई वडील नाहीत. मी मामा मामीकडे राहतो. आता मी घरी गेलो तर ते ओरडतील’ असे सांगू लागल्याने दाभाडे यांनी त्याला घरी नेले. तो त्याचा पत्ता सांगत नव्हता. त्यामुळे दाभाडे यांनी रविवारी सकाळी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या सदस्यांना माहिती दिली.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी मुलाला तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितले. मुलाकडे चौकशी करून त्याच्या शाळेचे नाव जाणून घेतले. त्याची शाळा खोपोली येथे असल्याचे समजताच खोपोलीचे सहायक निरीक्षक हरेश काळसेकर यांना मुलाची माहिती पाठवली. त्यावेळी मुलाचे पालक पोलीस ठाण्यातच बसले होते. पालकांनी गराडे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार राजेश चव्हाण यांनी मुलाला खोपोली येथे नेऊन त्याला सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले.

या शोधकार्यात शिवदुर्ग मित्र लोनावळा, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे ,शुभम काकडे, विनय सावंत, सत्यम सावंत, अनिश गराडे, राकेश दाभाडे, सुरज दाभाडे यांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.