Maval: लोकसभेचे पडघम, पार्थ पवारांच्या गाठीभेटी वाढल्या, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांनी शहरातील पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेत विकासकामांची पाहणी केली. मोरया गोसावी चरणी लिन होऊन प्रचाराचा श्री गणेशा केला आहे. तर, उमेदवारीवरुन शिवसेना-भाजपच्या पदाधिका-यांमध्ये जुंपली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांची मावळातून उमेदवारी जवळपास निश्चित आहे. लोकसभेची पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीचे संकेत देखील दिले आहेत. पार्थ यांनी मतदारसंघ पिंजून काढायला देखील सुरुवात केली आहे. शहरातील विकासकामांची पाहणी देखील त्यांनी केली. पार्थ यांनी पदाधिका-यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. यावेळी कोणत्याही परस्थितीत मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणायचाच असा इरादा पक्षाने केला आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली असून प्रचारात आघाडी घेतली आहे.

  • शिवसेना-भाजप पदाधिका-यांमध्ये उमेदवारीवरुन जुंपली आहे. गेल्या पाच वर्षात खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजप सरकारच्या निर्णयावर सातत्याने टीका केली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून बारणे यांना निवडून आणले. परंतु, निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारणे शिवसेनेचे उमेदवार असल्यास आणि युती झाल्यास तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देऊन बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

भाजपच्या पत्रकबाजीला शिवसेनेच्या पदाधिका-यांनी तितक्याच आक्रमपणे प्रत्युत्तर दिले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या लोकप्रियतेने भाजपचे नेते हवालदिल झाले आहेत. बारणे यांच्या उमेदवारीच्या विरोधात बोलणा-या नगरसेवकांचा बोलविता धनी जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला छुपी मदत करण्यासाठी आणि मागील निवडणुकीच्या पराभवाचे शल्य मनामध्ये ठेऊन वैयक्तिक स्वार्थापोटी पत्रकबाजी चालवली असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

  • एकंदरीतच खासदार बारणे यांच्या उमेदवारीवरुन आगामी काळात भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. भाजप खासदार बारणे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.