Maval: सामाजिक बांधिलकी जपत झाले शुभमंगल! सीएम फंड, माय माऊली फाउंडेशनला दिली 72 हजारांची देणगी

लग्नखर्च वाचवून वधूला दिला पाच लाखांचा धनादेश!

एमपीसी न्यूज –  दोन्ही कुटुंबातील लोक समंजस असतील तर विवाहबंधन सोहळ्यात थाटमाट नसताना देखील आनंदाचा जल्लोष करता येतो. हा जल्लोष आहे सामाजिक कृतज्ञतेचा आणि पिंगट-चव्हाण या वधू-वर कुटुंबातील लोकांचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारे नियम पाळताना त्यांनी उदार मनाने मुख्यमंत्री सहायता निधीस 21 हजार तर ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या माय माऊली फाउंडेशनला 51 हजारांची रक्कम गोरगरीब गरजूसाठी दिली. त्याचबरोबर वधू पित्याने आपल्या मुलीला शिक्षणासाठी व भविष्यासाठी कन्यादान म्हणून पाच लाख रूपयाचा धनादेशही देण्यात आला. 

इंदोरी येथे हा सोहळा 5 मे रोजी सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सिग) , तोंडाला मास्क व मर्यादित उपस्थिती ठेऊन विवाह सोहळा सकाळी 9:45 वा. पार पडला. मावळचे आमदार सुनील शेळके, तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील व तळेगाव नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती व तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला.

20 फेब्रुवारी रोजी या नववधू वरांचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात पार पडला, त्याच वेळी 5 मे ही विवाहाची तारीख नातेवाईकांमध्ये जाहीर करण्यात आली. तेव्हा पासून हे दोन्ही परिवार आपापल्या पध्दतीने विवाहाचे नियोजनामध्ये मग्न झाले होते. मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या महामारीचे आगमन झाले. देश, राज्य, जिल्हा सर्व ठिकाणी लॉकडाऊनची  घोषणा करण्यात आली. ही कोरोनाची महामारी आज-उद्या संपुष्टात येईल या आशेवर मुलीचे वडील श्री साई फ्रेंडस् सर्कल संचालित कै दादू इंदुरीकर इंद्रायणी अंध अनाथ केंद्रचे संस्थापक व  गुणवंत कामगार संजय चव्हाण (इंदोरी)  व मुलाचे वडील पिंपरी चिंचवड येथील शासकीय आयटीआयचे शिल्पनिदेशक लक्ष्मण पिंगट (गहुंजे) हे दोघेही होते. परंतु दिवसागणीक दिवस लॉकडाऊन वाढत गेले.विवाहाची तारीख जवळ येत गेली. काय करायचे अशा संभ्रमात असतानाच आपण साध्या पध्दतीने लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला. व कोरोनाच्या महामारीमध्ये सापडलेल्या मावळातील गोरगरीब नागरिकांना, व मुख्यमंत्री सहायता निधीला दोन्ही कुटुंबाकडून मदत करण्याचे ठरले.

पाच मेला सकाळी हा विवाह इंदोरी येथे संपन्न झाला. यावेळी मर्यादित उपस्थिती, सोशल डिस्टन्सिंग व सर्व उपस्थितांनी तोंडाला मास्क लावले होते. विवाह मंडपात सुरक्षित अंतरासाठी चौकोन आखण्यात आले होते. या चौकोनात वधु, वर, मुलाचे मामा, मुलीचे मामा, दोघांचे आई, वडील, भटजी आदी मर्यादित उपस्थितांची नावे टाकून ठेवण्यात आली होती. वाजंत्री, डीजे, ढोल- ताश्या, ध्वनिक्षेपक आदि बाबी नसल्याने या विवाहाचे वेगळेपण जाणवत होते.

याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके यांचेकडे मुलीचे वडील संजय चव्हाण, मुलाचे वडील लक्ष्मण पिंगट या दोन्ही परिवारांकडून मुख्यमंत्री निधीसाठी 21 हजार तर मावळच्या गोरगरीब कुटुंबांसाठी  खारीचा वाटा म्हणून माय माऊली फाऊंडेशनला  51 हजारांचा धनादेश दिल्याने उपस्थितांनी या कृतीचे कौतुक केले.

वधू श्वेता यांनी बीफार्मसी व डीफार्मसी या पदविका व पदवी प्राप्त केली आहे तर वर पराग हे इंजिनिअर आहेत. हे दोन्ही वधू वर उच्च शिक्षित आहे.वधूपित्याने आपली कन्या श्वेता हिच्या नावाने लग्नासाठी होणारा खर्च टळल्याने पाच लाख रूपयांचा धनादेश त्यांच्या भविष्यासाठी वधू व वरांसाठी दिला.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त मोजक्याच मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.