Maval news: महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन

पवनानगर धरण परिसरात कोरोना संकटाचे सावट लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने हा जलपूजन सोहळा पार पडला.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज, मंगळवारी पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन करण्यात आले.

पवनानगर धरण परिसरात कोरोना संकटाचे सावट लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने हा जलपूजन सोहळा पार पडला.

महापौरांचे कुटुंबीय तसेच पाणीपुरवठा व जलनि:स्सारण विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी, रामनाथ टकले, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अशोक शेटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर व महापौर यांचे स्वीय सहाय्यक दत्तात्रय दुचे आदी उपस्थित होते.

ऑगस्ट महिन्याअखेर झालेल्या पावसाने पवना धरण 100 टक्के पूर्ण भरले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे, असे सांगत महापौर उषा ढोरे यांनी समाधान व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडकर मागील नऊ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. यंदा जुलै पर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता.

त्यामुळे पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे होती. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला.

धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे रविवार सकाळपासून 2200 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण 100 टक्के भरल्याने आता दररोज पाणीपुरवठा होईल. नऊ महिन्यानंतर पाणी कपातीचे संकट संपेल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. पण, तूर्तास नागरिकांची निराशा झाली.

वाढीव 30 ते 40 एमएलडी पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.