Maval News : शासकीय कार्यालयाच्या आवारात खाजगी वाहनांना प्रवेश मिळावा; प्रदीप नाईक यांची मागणी

0

एमपीसी न्यूज – बहुतांश शासकीय कार्यालयात खाजगी वाहनांना प्रवेश दिला जात नाही. सर्व शासकीय कार्यालये नागरिकांसाठी असताना नागरिकांच्या वाहनांना मात्र प्रवेश नाकारला जातो. रस्त्यावर वाहने पार्क केल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. अशा वेळी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शासकीय कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांना कार्यालयाच्या आवारात पार्किंगसाठी प्रवेश मिळावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहेत. त्या म्हटले आहे की, महापालिका, जिल्हा परिषद, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय यांसारख्या शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची दैनंदिन कामे असतात. त्यासाठी अनेक नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागते. मात्र, शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षक खाजगी वाहनांना आवारात परवानगी नसल्याचे सांगतात. कार्यालयाच्या आवारात केवळ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग असल्याचे सांगितले जाते.

_MPC_DIR_MPU_II

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कार्यालयाच्या बाहेर वाहने पार्क केल्यास रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड असतात. त्यामुळे शासकीय कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केल्यास वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. वाहतूक विभागाकडून भरमसाठ दंड वसूल केला जातो.

शासकीय कार्यालये जनतेसाठी असतात. तेथील वाहन पार्किंग व्यवस्था पाहणे हे देखील संबंधित शासकीय कार्यालयांची जबाबदारी आहे. घटनेच्या समानतेच्या तत्वाची ही उघड उघड पायमल्ली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात पार्किंग, बैठक व्यवस्था, प्रतिक्षालय, प्रसाधन व्यवस्था, जलपान व्यवस्था असणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून वाहन पार्किंगमध्ये शिस्त आणावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.