PCMC : होर्डिंगमुळे जिवीत किंवा वित्तहानी झाल्यास होर्डिंगधारक जबाबदार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये असणाऱ्या (PCMC)सर्व जाहिरात फलक धारकांनी उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चर मजबुत आहे याची खातर जमा करणे गरजेचे आहे. जर स्ट्रक्चर कमकुवत असेल तर ते त्वरित हटविण्यात यावे. येत्या काही दिवसांत वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने स्ट्रक्चर पडून जिवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास जाहिरात फलक धारकास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये  विविध ठिकाणी जाहिरात फलक धारकांनी(PCMC) जाहिरात फलक मंजुर करुन उभारले आहेत. येत्या काही दिवसात पावसाळ्यास सुरुवात होईल. पावसाळयाच्या सुरुवातीस वादळ, वारा मोठया प्रमाणावर येत असतो. अशा प्रकारच्या वादळवाऱ्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडुन जिवीतहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापुर्वी झालेल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीस सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त संदीप खोत तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही जाहिरात फलक हे महापालिका परवानगी करीता प्रलंबित आहेत. ही बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तसेच सर्व जाहिरात फलकांची सादर केलेली स्ट्रक्चर स्टॅबिलिटी पुन्हा सन 2024-25 एप्रिल अखेर पर्यंत तपासुन घेण्याबाबत सूचना बैठकीत देण्यात आल्या.

आकाशचिन्ह विभागाचे उपआयुक्त संदीप खोत म्हणाले, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आकाशचिन्ह व परवाना विभागास सादर करणे बंधनकारक असणार आहे. जाहिरात फलकांना ज्या संरचना अभियंताने प्रमाणपञ दिलेले आहे, त्यापैकी एखादे जाहिरात फलक कमकुवत आढळले किंवा फलक पडून काही जिवित व वित्त हानी झाल्यास संबंधित संरचना अभियंतास जबाबदार धरण्यात येणार आहे.

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. अनेकदा मंजुर केलेल्या फलकांचे नुतनीकरण करताना स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सादर केलेले असले तरीही अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो, तसेच अनेकदा जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असते. हा विषय गंभीर असून याबाबत महापालिकेने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.