Maval News: आंदर मावळातील शालेय विद्यार्थ्यांनी सहारा वृध्दाश्रमात काढली सहल

एमपीसी न्यूज – अनाथ व निराधाराचं जगणं नेमकं कसं असतं? हे पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहारा वृध्दाश्रमास भेट देऊन आजी आजोबांसमवेत आनंद साजरा केला.

आंदर मावळमध्ये कुसवली येथे अनाथ व निराधार असलेल्या आजी आजोबांसाठी सहारा वृध्दाश्रम उभारण्यात आलेला आहे. आदिवासी गाव व जंगलसदृश्य विलोभनीय परिसर असलेल्या या वृध्दाश्रमातील आजी आजोबांना आनंदाचे क्षण वाटण्यासाठी याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट देत सर्वांना खाऊ वाटला.

मुलांना मानवी जीवनाची ओळख व्हावी, संस्काराची उत्तम बीजे त्यांच्यामध्ये रूजावी यासाठी जाणिवपूर्वक वृध्दाश्रमाची सहल घडवून आणण्यात आली होती.या अनोख्या सहलीने व मुलांच्या प्रेमाने सर्व आजी आजोबा प्रचंड भारावून गेले. नातवंडांच्या मायेला पारखे झालेल्या या निराधार आजी आजोबांना मुलांच्या दंगा-मस्तीमुळे व खाऊ देत प्रेमपूर्वक विचारपूस करण्यामुळे अश्रु अनावर झाले. शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वर पवार यांनी आपला मुलगा धुर्व याच्या वाढदिवसानिमित्त ही विशेष सहल घडवून आणली होती. शाळेच्या शिक्षिका व अन्य स्टाफने मिळून यावेळी वृध्दाश्रमास डाळ, तांदूळ व साखर दिली.वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.