Maval News: लसीकरणातील कथित ‘वशिलेबाजी’च्या आरोपावरून मावळात ‘घमासान’

एमपीसी न्यूज – मावळात लसीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी चिठ्ठ्या देत वशिलेबाजी चालविली असल्याचा आरोप भाजप नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केल्यामुळे तालुक्यात तो चांगला चर्चेचा विषय झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एका लसीकरण केंद्रावर देण्यात येत असलेल्या टोकन क्रमांकाच्या चिठ्ठीला वशिलेबाजी म्हणून विरोधक वस्तुस्थितीचा विपर्यास करीत आहे, असा प्रत्यारोप आमदार शेळके यांनी केला आहे. 

आमदार शेळके यांचे नाव छापलेली लसीकरणाबाबतची एका नागरिकाला दिलेली चिठ्ठी दाखवत बाळा भेगडे यांनी एका वृत्तवाहिनीद्वारे आमदारांवर वशिलेबाजीचा आरोप केला. लसीकरण प्रक्रियेत आमदार हस्तक्षेप करीत असून मावळात लसीकरण मोहिमेत वशिलेबाजी सुरू असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार शेळके यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन तसेच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांची भूमिका मांडली. घरात बसून बिनबुडाचे आरोप करीत राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी रस्त्यावर उतरून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शेळके यांनी केले.

देशात सध्या कोरोना लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागतात. तासन तास रांगेत उभे राहून देखील लस मिळत नाही. त्यामुळे कित्येक नागरिकांना निराश होऊन घरी परतावे लागते. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद करून त्याला टोकन क्रमांकाची चिठ्ठी देण्याची पद्धत आपल्या कार्यकर्त्यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या आवारातील रिक्रिएशन हॉल लसीकरण केंद्रावर सुरू केली आहे. प्रत्येक दिवशी उपलब्ध लसींच्या संख्येएवढीच टोकन दिली जातात. त्यामुळे टोकनची चिठ्ठी मिळालेल्या प्रत्येक नागरिकाला त्या दिवशी खात्रीने लस मिळते. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होत नाही. या केंद्रावर आपल्या कार्यकर्त्यांकडून लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी आसनव्यवस्था, पाणी, चहा-बिस्किटांची देखील सोय करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.

लसीकरणाबाबतची चिठ्ठी आपल्या कार्यालयातून दिली जात असेल आणि ती चिठ्ठी असलेल्या नागरिकांनाच लस दिली जात असती तर त्याला वशिलेबाजी म्हणता आले असते. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोणताही भेदभाव न करता टोकन क्रमांकाची चिठ्ठी दिली जात असेल तर त्याला वशिलेबाजी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असा टोला शेळके यांनी लगावला आहे. कितीही आरोप झाले तरी टोकन पद्धत नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने ती बंद केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मावळ तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक नागरिकाला लस मिळण्याबाबत आपण आग्रही आहोत. त्यासाठी लशींची उपलब्ध वाढविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. दिवसाला तालुक्यात दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण काम करीत आहोत. लशींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे नियोजन देखील तयार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

मग ‘पंतप्रधानांची वशिलेबाजी’ म्हणायचे का?
लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांना देण्यात येत असलेल्या टोकन क्रमांकाच्या चिठ्ठीवर कार्यकर्त्यांनी आमदार या नात्याने आपले नाव टाकल्याने ती वशिल्याची चिठ्ठी ठरत असेल, लसीकरणाच्या प्रत्येक सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापलेले आहे. याचा अर्थ पंतप्रधानांचा वशिला असल्यामुळे लस मिळाली असा काढणे योग्य नाही. त्यामुळे विरोधकांनी आरोप करून वस्तुस्थितीचा विपर्यास करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करु नये, असे आमदार सुनील शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.