Maval : लोकसभा मतदारसंघात सहा ‘सखी’ मतदान केंद्र

एमपीसी न्यूज – महिलांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मावळ लोकसभा मतदारसंघात सहा ‘सखी’ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक एक ‘सखी’ मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असणार आहेत.

निवडणूक आयोगातर्फे मतदान प्रक्रियेत महिलांनी सहभागी होत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी ‘सखी’ बूथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी’ बूथ तयार करण्यात आला आहे. या केंद्रांवर महिला अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

…..हे आहेत सहा ‘सखी’ मतदान केंद्र

पिंपरी येथील महापालिकेच्या विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक तीन मधील मतदान केंद्र क्रमांक 304 ‘सखी’ बूथ असणार आहे.

चिंचवड मतदारसंघात थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण महापालिका शाळा क्रमांक 60/1, पहिला मजल्यावरील खोली क्रमांक एक मधील मतदान केंद्र क्रमांक 178 ‘सखी’ बूथ असणार आहे.

मावळ मतदारसंघात कान्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोली क्रमांक एक मधील मतदान केंद्र क्रमांक 117 ‘सखी’ बूथ असणार आहे.

कर्जत येथील आर. झेड. पी. प्राथमिक मराठी कन्या शाळेतील खोली क्रमांक एक मधील मतदान केंद्र क्रमांक 166 ‘सखी’ बूथ आहे.

पनवेल येथील विखे पाटील शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 344 तर उरण मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 229 ‘सखी’ बूथ असणार आहे.

याबाबत बोलताना मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता व्दिवेदी म्हणाले, ”महिलांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यासाठी आयोगातर्फे महिलांसाठी संपूर्ण महिला अधिकारी असलेला स्वतंत्र बूथ तयार केला जातो. त्याला अगोदर रंग देऊन त्या बूथला ‘पिंक’ बूथ असे संबोधले जात होते. आता रंग न देता ‘सखी’ बूथ असे संबोधले जाते.

”काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला मतदार असतात. या केंद्रांवर संपूर्ण महिला अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जातात. महिला अधिकारी असल्यामुळे महिलांना सुरक्षित वाटते. त्यासाठी ‘सखी’ बूथची संकल्पना राबविली जात आहे. यामुळे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढतो. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा ‘सखी’ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत”, असेही द्विवेदी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.