Maval : फार्म हाऊसच्या व्यवस्थापक खून प्रकरणातील आरोपींची रेखाचित्रे काढून शोधण्याचा प्रयत्न

गोळीबाराच्या घटनेला दहा दिवस होऊन गेल्यानंतरही आरोपी मोकाटच!

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे झालेल्या फार्म हाऊस व्यवस्थापकाच्या खून प्रकरणातील आरोपी दहा दिवसानंतरही मोकाटच आहेत. पोलिसांनी आरोपींची रेखाचित्रे तयार करून त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मिलिंद मधुकर मणेरीकर (वय 50, रा. तळेगाव) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद मणेरीकर हे वाहनगाव जवळ असलेल्या संकल्प फार्म हाऊस येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मणेरीकर 22 जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे सहकारी चेतन निमकर यांच्यासोबत कारमधून (एम एच 14 /ई एच 3324) फार्महाऊसवर जात होते.

वाहनगाव जवळ गेले असता त्यांच्या कारच्या मागून एका मोटारसायकल वर अज्ञात दोघेजण आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट देखील नव्हती. त्यांनी मणेरीकर यांच्या कारला हात दाखवून थांबवले. मणेरीकर यांना हांडे पोल्ट्री कुठे आहे असे आरोपींनी विचारले. त्यांना हांडी फार्म हाऊसचा पत्ता सांगण्यासाठी मणेरीकर यांनी कारची काच खाली घेतली. त्यानंतर आरोपींनी मणेरीकर यांच्यावर गावठी  कट्ट्याने गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये मणेरीकर यांच्या पोटात तीन गोळ्या लागल्या आहेत. ते गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र 29 जुलै रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेला आता दहा दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कुठलेही धागेदोरे लागलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींची साक्षीदाराने केलेल्या वर्णनानुसार मास्क घातलेले रेखाचित्रे तयार केली आहेत. मास्क काढल्यानंतर ते आरोपी कसे दिसतील याची कल्पनाचित्रेही तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे आता पोलीस आरोपींचा शोध घेणार आहेत. आरोपींबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास वडगाव मावळ पोलीस स्टेशनला (9767438098) माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.