Chakan :कांद्याच्या कमाल भावात सुधारणा होईना

शेतकरी घायकुतीला; कांद्याला ४०० ते ९०० रुपये भाव, चाकणला २६ हजार क्विंटलची आवक

एमपीसी न्यूज – कांदा उत्पादन खर्च भरून निघून दोन पैसे गाठीला शिल्लक राहतील एवढ्या माफक अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला कांदा आता कोंब येत असल्याने आणि चाळीत गुदमरून सडू लागला आहे. साठवणुकीतील हा कांदा अवघ्या १ ते २ रुपये किलो दराने बाजारात आणून विक्री करावा लागत आहे. नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याचे कमाल भावात ८०० ते ९०० रुपयांच्या पुढे जात नाहीत. कांद्याला मिळणारा हा भाव परवडणारा नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः घायकुतीला आले आहेत.

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केट यार्डात शनिवारी (दि.१९) २६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत आणखी चार हजार क्विंटलची वाढ झाली. मात्र, कांद्याचे भाव ४०० ते ९०० रुपये क्विंटल यावरच अडकून पडले आहेत. जुन्या पाठोपाठ नव्या कांद्यानेही शेतकऱ्यांचे गणित बिघडवले आहे. चाकण येथील बाजार समितीत ऊन्हाळ कांद्याची आवक अजून टिकून आहे. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात घसरण सुरूच आहे. यंदा चाकणमधील कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल राज्यात आणि दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश, सिंगापुर या परदेशात मागणी सर्वसाधारण असून बाजारभाव ४०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावले आहेत.

सध्या आवक होत असलेला कांदा निर्यातक्षम असूनही अपेक्षित बाजारभावा अभावी मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी होत आहेत. बाजारात नवीन गावरान कांद्याची आवक गेल्या चार आठवड्यापासून वाढतच असल्याने कांद्याचे भाव वधारत नसल्याची स्थिती आहे. कांद्याचे भाव खाली असलेले असल्याने सामान्य ग्राहक सुखावले असले, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच यंदा उशिरा लागवड झालेला कांदा पुढील काळात मोठ्या प्रमाणावर बाजारात येणार असल्याने निर्यातीची स्थिती अशीच राहिल्यास कांद्याचे भाव आणखी घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरवर्षी येतोय तोच अनुभव
प्रत्येक वर्षी या हंगामात कांद्याच्या झुलत्या बाजारभावाने उत्पादक शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरत आहे. यंदा पावसाच्या लहरीपणाने कसेबसे कांद्याचे पीक जगवले. आता कांदा बाजारात विक्रीसाठी आणला असता भावाने दगा दिला दिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कांदयाचे बी-बियाणे, खते, औषधे आणि वाहतूक खर्चात वाढ झालेली असल्याने कांद्याच्या उत्पादनाचे गणित कोलमडले आहे. उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सततच्या या अनिश्चितते मुळे या भागातील कांदा उत्पादनात अग्रेसर असणारा मोठा कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आगामी काळात कांदा लागवडीबाबतच गांभीर्याने विचार करीत असल्याने कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

पीक नियोजनात काटेकोरपणा हवा
कांदा पिकाच्या बाबतचे धरसोडीच्या धोरणामुळे कांद्याच्या एकूण निर्यातीवर परिणाम झाला आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांच्या फारशा फायद्याचा ठरणार नसल्याने स्पष्ट आहे. कारण हे अनुदान केवळ १५ डिसेंबर पर्यंत बाजार समितीत कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. उन्हाळ आणि नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे केंद्राने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या उच्च प्रतीच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. दरवेळी अशा प्रकारे तहान लागल्यावर विहीर खोदण्याऐवजी दूरदर्शीपणाने काही ठोस पावले उचलली पाहिजेत. पीक नियोजनात काटेकोरपणा आणला पाहिजे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.