Meaning of National Pledge : अर्थ प्रतिज्ञेचा (भाग 6) मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

एमपीसी न्यूज (प्रा. श्रीपाद भिडे) – मित्रांनो, संस्कार हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. संस्कार हि एक मूल्यवर्धक प्रक्रिया आहे. ‘संस्कार’ व ‘संस्कृती’ ह्या दोन्ही शब्दात साम्य म्हणजे ‘सम्’ हा उपसर्ग आणि ‘कृ’ हा धातू. ‘सम् + कृ’ चा व्युत्पत्त्यर्थ ‘चांगले रूप देणे’, ‘शुद्ध करणे’, ‘सुंदर करणे’, ‘पवित्र करणे’ असा बहुविध आहे.

आपला जो मूळ स्वभाव असतो त्याला प्रकृती असे म्हणतात. मग तो सजीव असो व निर्जीव. जसे दगडाचा मूळ स्वभाव आहे त्याच ठिकाणी पडून राहणे. सतत उताराच्या दिशेने वाहने हा द्रवरुप पदार्थांचा मूळ स्वभाव म्हणजेच प्रकृती. ह्या मूळ स्वभावात जेव्हा काही कारणाने वाईट बदल घडतो त्याला विकृती म्हणतात. परंतु वाईट गोष्टींचा संपर्क टाळून मूळ स्वभावात बिघाड होऊ न देता, ज्या क्रिया-प्रक्रियांद्वारा चांगले रूप दिले जाते, त्यांना ‘संस्कार’ म्हणतात व त्या वस्तूला ‘सुसंस्कृत’ किंवा ‘सुसंस्कारित’ म्हणतात.

ज्याप्रमाणे दुधात मध , साखर , दही , तूप मिसळले तर पंचामृत बनते.आणि असे पंचामृत मंत्रोच्चारांनी नैवेद्य दाखवून प्राशन केले तर त्याला संस्कारीत म्हणतात जे शरीराला अतिशय पोषक ठरते. मग हे संस्कार वस्तू प्रमाणे बदलतात. लाकूड, पाषाण, धातू इ. संस्कार्य वस्तू कापणे, ठोकणे, तापविणे, घासणे, कोरणे इ. क्रिया करून, त्यांना सुबक आकार देऊन त्यातून शिल्प, अलंकार, उपयुक्त वस्तू व उपकरणे, शोभेच्या वस्तू बनविल्या जातात म्हणजेच त्या संस्कारीत झाल्या.

मग सजीवांच्या बाबतीत हे कधी घडू शकते? तर वय लहान असताना. जोपर्यंत मनाची पाटी कोरी असते तेव्हाच सुसंस्कार करणे अपेक्षित आहे. नाहीतर थंड झालेल्या लोखंडाला आकार कसा येईल?

दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड |

येईल आकारास कसे झाल्यावर ते थंड ||

संस्कार हि आपल्याला मिळालेली जणू धनाची पेटी, परंपरागत शिदोरीच आहे. समाजात वावरताना आपले वर्तन कसे हवे? आपले आचार विचार ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आपल्या धर्मात तर लहान मूल आईच्या गर्भात असल्यापासून ते मृत्यूपर्यंत सोळा संस्कार सांगितले आहेत. आपल्या भारतात जे संत माहात्मे होऊन गेले त्यांनी स्वतःचे उभे आयुष्य समाजाला सदाचार शिकवण्यात व्यतीत केले.

मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

मानवाच्या जीवनात त्याचा प्रथम गुरु ही त्याची जन्मदात्री माताच असते, जी त्याला अगदी जन्मापासून बोलायचे, चालायचे, धावायचे कसे ह्याचे प्राथमिक धडे शिकविते. पाटीवर हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकविते. मुले शाळेत जायला लागली कि जगाचे व्यावहारिक ज्ञान हे वडील देत असतात. वडील हे जणू अनुभवांचे पुस्तकाचं असते. आपल्या आई वडिलांप्रमाणेच आपल्या जीवनात गुरुचे स्थान तितकेच महत्वाचे आहे. आपल्या संस्कृतीत गुरूला साक्षात परब्रम्हाची उपमा दिली आहे. आपल्या गुरूंमुळेच हि जीवनाची नौका पार होते. गुरूबद्दल संत कबीर म्हणतात – गुरु बिन कौन बतावे बाट | गुरु बिन बड़ा विकिट यम घाट || आणि म्हणूनच आपल्या भारतवर्षात फार प्राचीन काळापासून गुरु शिष्य ही थोर परंपरा आहे.

आपले आई वडील व सर्व वडीलधारी माणसे हि कायम आपल्याला वंदनीयच असली पाहिजेत. ज्या आईवडिलांमुळे आज समाजात आपले स्थान पक्के झाले इतकेच नव्हे तर आपली ओळख प्रस्थापित झाली; त्या आईवडिलांचा अथवा आपल्या घरातील सर्वच थोरामोठ्यांचा मान राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मान राखणे म्हणजे त्याच्या शिकवणुकीचा आदर करणे आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करणे.

त्यांनी शिकविलेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टीचा ध्यानात घेऊन त्या आचरणात कशा आणता येतील ह्याचा सतत विचार व्हायला हवा. आता फक्त आईवडील आणि घरातील मोठी माणसेच का तर नाही समाजातील प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकत असतो. इथे वय, जात , धर्म हे सारेच गौण आहे.

आपल्या सद्सदविवेकबुद्धीच्या जोरावर ज्या गोष्टी स्विकारण्यास लायक आहेत व अनुकरणीय आहेत हे अंगिसाद करावयास हव्या. स्वतः दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. पंचमहाभूतांपासूनते कोळी ह्या कीटकापर्यंत. प्रत्येकामध्ये अनुकरणीय व त्याज्य गोष्टी असतात. ह्याकरिता समर्थ रामदास म्हणतात – सार शोधून घ्यावें । असार ते जाणोनि त्यागावे ||

मित्रांनो, आपल्या अवतीभवती तीन प्रकारचे थोर लोक असतात. जे वयाने आपल्यापेक्षा मोठे आहेत असे वयोवृद्ध लोक, जे आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत ते ज्ञानवृद्ध लोक मग ते वयाने लहानही असू शकतात आणि जे आपल्या तप साधनेतून म्हणजेच एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ज्ञानाने आणि कर्माने मोठे होतात हे लक्षात घेतले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.