Talegaon Dabhade News : इनाली फाउंडेशन बसविणार 9 राज्यातील 23 शहरातील दिव्यांगांना मोफत रोबोटिक हात व पाय

आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते 'लिम्स ऑन व्हील' शिबिराचा शुभारंभ

एमपीसीन्यूज – आपण आपल्या आयुष्यात किती पैसे कमावले, हे महत्त्वाचे नाही, तर समाजासाठी काय दिले, हे महत्त्वाचे आहे. भारताला शून्य दिव्यांग देश बनविण्याच्या उद्देशाने तळेगाव येथील युवक करीत असलेले कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील इनाली फाउंडेशनच्या वतीने भारतातील 9 राज्यातील 23 शहरामध्ये 700 हून अधिक दिव्यांगांना मोफत रोबोटिक हात व पाय बसविण्यात येणार आहेत. ‘लिंब्स ऑन व्हील’ या शिबिराचा शुभारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते मावळातील पहिल्या मुलीला रोबोटिक हात बसवून आणि सुसज्ज रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी इनाली फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत गाडे, माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, सचिन गराडे, ॲड. नामदेव दाभाडे, संतोष परदेशी, इम्रान अलमेल, कुणाल खळदे, कुणाल काळोखे, विनिश वेणुगोपाल आदी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, की दिव्यांगांना समाजात ताठ मानेने वावरता यावे, या उद्देशाने त्यांना रोबोटिक म्हणजे हालचाल करणारे हात, पाय मोफत बसविण्यात येत आहेत, ही अतुलनीय बाब आहे. कोणतीही अपेक्षा न बाळगता समाजासाठी झटणाऱ्या इनाली सारख्या संस्थांना आर्थिक भांडवल मिळाले पाहिजे. अशी संस्था मावळ तालुक्यात आहे, याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यामुळे अशा संस्थांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

प्रशांत गाडे यांनी सांगितले, की संपूर्ण भारत शून्य दिव्यांग देश झाला पाहिजे, या दृष्टीने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या दिव्यांगांना आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यात येणे शक्य नाही, त्यांना जागेवर जाऊन रोबोटिक हात, पाय मोफत बसविण्यात येत आहेत. एवढेच नाही तर प्राण्यांसाठीही अशी सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी इनाली फाउंडेशनच्या कार्यशाळेतील रोबोटिक हात, पाय बनविण्याची प्रक्रिया समजून घेत संस्थेच्या या वैविध्यपूर्ण कामाबद्दल कौतुक केले.

इनाली फाउंडेशनची स्थापना 2018 मध्ये झाली. तळेगाव (पुणे), हैद्राबाद व खांडवा (मध्यप्रदेश) या तीन ठिकाणी संस्थेची कार्यालये आहेत. भारताला शून्य दिव्यांग देश बनविणे, हा संस्थेच्या स्थापनेचा उद्देश होता. संस्थेची त्या दिशेने वाटचाल सुरू असून, गेल्या चार वर्षात संस्थेने पाच हजाराहून अधिक दिव्यांगांना मोफत रोबोटिक हात पाय बसवून दिले आहेत. एवढेच नाही तर हात, पाय नसलेल्या प्राण्यांनाही अशा प्रकारे हात, पाय बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच एका मांजरावर असा यशस्वी प्रयोग देखील संस्थेने केल्याचे संस्थापक प्रशांत गाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.