Monsoon 2020 Progress: कोकण व मुंबईत लवकरच मान्सूनच्या आगमनासाठी पोषक परिस्थिती

Monsoon 2020 Progress: Nutrient conditions for early arrival of monsoon in Konkan and Mumbai मान्सून सध्या कर्नाटकातील कारवार, हसन तसेच सालेम, पुडुचेरी वरून पुढे दक्षिण-पश्चिम आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्यभागापर्यंत पोहचला आहे.

एमपीसी न्यूज – मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून गोवा, दक्षिण कोकण आणि मुंबईत मान्सूनचे लवकरच आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सात जून हा महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाचा सर्वसाधारण दिवस आहे. 

नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल दक्षिण मध्य कर्नाटकच्या आणखी काही भागात, रायलसीमाच्या काही भागात, तमिळनाडूच्या बऱ्याच भागात, नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण भागात, पश्‍चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण भागात, वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग तर ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात झाली आहे, असे हवामान खात्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मान्सून सध्या कर्नाटकातील कारवार, हसन तसेच सालेम, पुडुचेरी वरून पुढे दक्षिण-पश्चिम आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्यभागापर्यंत पोहचला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे यावेळी मान्सून दोन दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीला येऊन धडकला होता. महाराष्ट्रात आठ जूनपर्यंत मान्सून पोहचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, येत्या पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत कोकण- गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

मान्सूनचे आगमन कधीही झाले तरी पाऊस मात्र वेळेवर सुरू होत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.