Moscow : रशियामध्ये कार्यक्रमात ISIS संघटनेकडून दहशतवादी हल्ला; तिघांनी केला गोळीबार, 60 जणांचा मृत्यू तर 100 जण जखमी

एमपीसी न्यूज : रशियाची राजधानी (Moscow) मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये जोरदार गोळीबार झाला आहे. किमान तीन हल्लेखोरांनी सभागृहात उपस्थित लोकांवर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. शुक्रवारी सशस्त्र दहशतवादी मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या जमावावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी हॉलमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकून तो पेटवून दिला. वृत्तसंस्था स्पुतनिकने दिलेल्या माहितीनुसार, या प्राणघातक हल्ल्यात आतापर्यंत किमान 60 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका एकतर्फी जिंकून सत्तेवर आपली पकड मजबूत केली;  या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओंमध्ये, किमान तीन सशस्त्र हल्लेखोर लोकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.  रशियन पोलीस आणि एलिट कमांडो युनिट घटनास्थळी पोहोचले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामुळे सिटी हॉलमध्ये आग लागली, ती हेलिकॉप्टरच्या मदतीने विझवली जात आहे.

हल्लेखोरांनी कॉन्सर्ट हॉलला आग लावली –

मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉल मैफिलीच्या ठिकाणी शुक्रवारी किमान तीन जणांनी गोळीबार केला, असे स्पुतनिक रिपोर्टरने सांगितले. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले, तर कॉन्सर्ट हॉलला आग लागली. रिपोर्टरने सांगितले की, लष्करी पोशाख घातलेले किमान तीन लोक क्रोकस सिटी हॉलच्या तळमजल्यावर घुसले आणि त्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार केला.

या हल्ल्यात निश्चितच बरीच जीवितहानी झाल्याचे (Moscow) त्यांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी ग्रेनेड किंवा आग लावणारा बॉम्बही फेकला, ज्यामुळे आग लागली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.