Moshi : घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे महापालिकेस जागा देण्यास स्थानिकांचा विरोध

एमपीसी न्यूज – मोशी येथील जागा नियोजित सफारी पार्क तसेच 12 व 18 मीटर रस्ता करण्यासाठी प्रस्तावित असताना या जागेची मागणी घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. तसा प्रस्ताव महसूल व वन विभागाने तयार केला आहे. मात्र, त्याला मोशी आणि परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. घनकचरा प्रकल्पाला जागा देण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

मोशी येथील गट नं. (जुना 325) 327 येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी-चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/208 मनोरंजन केंद्र, आरक्षण क्रमांक 1/209 अ- प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्रमांक 1/207 सफारी पार्क यासह 12 मीटर व 18 मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. संबंधित गायरान जमीन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

दरम्यान, महसूल व वन विभागाच्या वतीने मोशीतील एकूण 77.01 हेक्टर क्षेत्रापैकी 2.54 हेक्टर आर क्षेत्र भाडेकराराने पुणे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. पुण्याच्या नागरिकरणाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढत असून पुणे शहरालगत घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध नाही. मात्र मोशी येथे अशी जागा असल्याने त्या जागेचा विचार व्हावा अशी मागणी पुणे मनपाने केली आहे

याबाबत भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले, ”संबंधित जागेवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे ही जागा पुणे महापालिकेस घनकचरा व्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी केली आहे. पुणे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात अडथळा निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.