Moshi Crime News : चुकीची औषधे देणाऱ्या मेडिकल दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला मारहाण

एमपीसी न्यूज – चुकीची गोळी दिल्याने त्याबाबत मेडिकल दुकानदाराला जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला मेडिकल दुकानदाराने लाकडाने मारून जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि. 22) सायंकाळी देहू-आळंदी रोड मोशी येथे मिलीग्राम केमिस्ट अँड ड्रगिस्ट या दुकानात घडला.

मधुकर प्रल्हाद कुडुक (वय 39, रा. रिव्हर रेसिडेन्सी, चिखली) असे जखमी ग्राहकाचे नाव आहे. याबाबत त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मेडिकल दुकानदार निलेश रामदास बोरुडे (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश याचे देहू-आळंदी रोड मोशी येथे मिलिग्राम केमिस्ट अँड ड्रगिस्ट नावाचे मेडिकल दुकान आहे. फिर्यादी कुडुक यांनी आरोपीच्या मेडिकल दुकानातून औषधे घेतली. त्यात आरोपीने वो – 2 नावाच्या गोळी ऐवजी वो – झेड नावाची गोळी दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपीच्या मेडिकल दुकानावर गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.