MPC News Special : अर्ध्या तासाचे वादळ अन शहराची धूळदाण

एमपीसी न्यूज – अवकाळी पाऊस अनेकांच्या जीवावर (MPC News Special) उठला आहे. अवकाळी पावसासोबत वादळी वारा देखील येत असल्याने अनेक ठिकाणी झाडपडी, होर्डिंग कोसळणे आणि आगीच्या घटना घडत आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सोमवारी (दि. 17 ) सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला. अर्ध्या तासात शहरात चार ठिकाणी झाडपडीच्या, दोन ठिकाणी आगीच्या तर दोन ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या.

सायंकाळी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला साडेचार वाजता पहिली वर्दी मिळाली. महेशनगर, पिंपरी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आग लागली. शाळेत कोणीही नसल्याने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. मुख्य केंद्राच्या एका बंबाने ही आग विझवण्यात आली.

सायंकाळी 5.36 वाजता दुसरी वर्दी मिळाली. शिंदेवस्ती, रावेत येथे एका सोसायटीमध्ये मोठे झाड पडले होते. प्राधिकरण उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी झाड कापून बाजूला करत सोसायटीमधील रस्ता मोकळा केला.

यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षातील फोन वाजू लागले. सायंकाळी 5.50 वाजता तिसरी वर्दी मिळाली. जुनी सांगवी मधील अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ झाड पडले होते. रहाटणी उपकेंद्राच्या जवानांनी जाऊन ते झाड बाजूला केले.

Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार का?

 

सायंकाळी 5.53 मिनिटांनी एक वर्दी मिळाली. माळीनगर, देहूरोड येथे इंद्रायणी नदीत माणसे अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी देहूरोडकडे धाव घेतली. मात्र नदीत माणसे अडकली नसून एक होर्डिंग पडले होते. यात कोणतीही हानी झालेली नसल्याचे समोर आले.

पाचवी वर्दी सायंकाळी 5.57 वाजता मिळाली. मुंबई-पुणे महामार्गावर होर्डिंग पडले असून त्याखाली काही लोक अडकले असल्याचे अग्निशमन विभागाला सांगण्यात आले. त्यानुसार रहाटणी, प्राधिकरण, पिंपरी येथील बंब घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले.

सायंकाळी 6.04 वाजता इंद्रायणीनगर भोसरी येथे आग लागली. मात्र स्थानिक नागरिकांनी ती विझवली. सुरुवातीला नागरिकांनी आगीची वर्दी दिली. मात्र आग विझल्यानंतर नागरिकांनी अग्निशमन विभागाला फोन करून आग विझल्याचे कळवले.

सायंकाळी 6.30  वाजता भोंडवे कॉर्नर, रावेत येथे बॅनर पडले. ते बॅनर प्राधिकरण येथील जवानांनी बाजूला केले. सायंकाळी 7.22 वाजता प्राधिकरण परिसरात एक झाड पडले. तिथेही प्राधिकरण उपकेंद्राच्या जवानांनी जाऊन झाड बाजूला घेण्यास मदत केली.

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. आकुर्डीकडून मुकाई चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फ़ा ठिकठिकाणी झाडे पडली. काही झाडे वाहनांवर पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. वीजवाहिन्या आणि इंटरनेट, फोन कंपन्यांच्या केबल तुटून नुकसान झाले. मंगळवारी सकाळी रस्त्यावर केबलचे जाळे (MPC News Special)  पसरले होते. अर्ध्या तासाच्या वादळाने शहराची पुरती धूळधाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.