Kiwale News : होर्डिंग दुर्घटनेची सखोल चौकशी करा

माजी नगरसेविका सीमा सावळे यांची मागणी

एमपीसी न्यूज – रावेत-किवळे परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून पाच (Kiwale News) निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुखद घटना घडली. या सर्व घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट केले होते का याचीसुध्दा सविस्तर माहिती जनतेसमोर आली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

MPC News Special : अर्ध्या तासाचे वादळ अन शहराची धूळदाण

आयुक्त सिंह यांना दिलेल्या निवेदनात  सावळे म्हणतात, या होर्डिंगला परवानगी दिली असल्यास अथवा संबंधितांनी परवानगी मागितली असल्यास परवानगीच्या प्रस्तावाप्रमाणेच होर्डिंग उभारले गेले होते का ? होर्डिंग अनाधिकृत असल्यास त्याबाबत कोणती कारवाई करण्यात आली होती ? होर्डिंग अनाधिकृत असून देखील त्याबाबत कोणतीही कारवाई केली गेली नसल्यास त्याबाबत कोण जबाबदार आहे ? या व अश्या प्रकारच्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी तातडीने सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

शहरातील सुमारे 433 अनधिकृत होर्डिंगविरोधात महापालिकेने कारवाई करू नये म्हणून पिंपरी चिंचवड आउट डोअर ऍडव्हरटायझींग असोसीएशन  उच्च न्यायालयात गेली होती. उच्च न्यायालयाने पुढील कारवाईस स्थगिती दिली असल्याचे समजते. तसे असल्यास सदर कोसळलेले होर्डिंग हे त्या 433 अनधिकृत होर्डिंगपैकी होते का ? सदर होर्डिंग अनधिकृत असल्यास अशा अनधिकृत होर्डिंगमुळे पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तातडीने उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्यात यावी. तसेच अनधिकृत होर्डींग्सबाबत  उच्च न्यायालयाने त्वरित निर्णय द्यावा ही विनंती करण्यात यावी. जेणेकरून यापुढे होऊ शकणारे असे प्रकारांना टाळता येतील, असेही सिमा सावळे यांनी सुचविले आहे.

होर्डिंग्सचे फेर सर्वेक्षण करा
शहरात असलेल्या जाहिरात होर्डींग्सचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे व नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. कालच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च मनपाने करावा. या सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेऊन दुःखद घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण त्वरित देऊन त्याबाबतची समिती गठीत करण्यात यावी. निश्चित कालमर्यादेत समितीने अहवाल सादर करण्याचे देखील आदेश देण्यात यावे. तसेच यापुढे अश्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना / तांत्रिकपद्धतीने भक्कम होर्डींग्स उभे करण्याचे धोरण तातडीने तयार करण्यात यावे, अशी आग्रही मागणी देखील सावळे यांनी केली आहे.

होर्डिंग्सच्या उभारणीत तांत्रिक त्रुटी

काल घडलेल्या घटनेमुळे ही बाब देखील समोर आलेली आहे कि, होर्डींग्स मध्ये हवा जाण्यासाठी ठिकठिकाणी छिद्र/Air Gaps उपलब्ध नाहीत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होर्डींग्स कोसळतात किंवा वाकू शकतात. मोठ-मोठ्या होर्डिंग्समध्ये छिद्र/Air Gaps उपलब्ध असल्यास, त्यामधून हवा जाऊ शकते, ज्यामुळे बॅनर आणि होर्डिंग्सवर दबाव कमी होतो व ते सुरक्षित राहू शकतात. परंतु मनपा हद्दीत उभे असलेल्या होर्डिंगला छिद्र/Air Gaps उपल्ध नसल्याने असे होर्डींग्स अधिक ( Kiwale News) धोकादायक ठरतात. होर्डींग्सच्या उभारणीत असलेली ही तांत्रिक त्रुटी सावळे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.