MPC News Special : तंबाखू घेतेय दर आठ सेकंदाला एकाचा बळी

पर्यावरणाचाही होतोय ऱ्हास

एमपीसी न्यूज – जागतिक आरोग्य संघटनेने सन 1988 मध्ये दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन (MPC News Special) म्हणून साजरा करण्याचे ठरवले. दरवर्षी तंबाखूला हद्दपार करण्यासाठी वेगवेगळ्या थीम घेऊन जगभरात प्रयत्न केले जातात. जगात दर आठ सेकंदाला एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होत आहे. तंबाखूमुळे मानवी जीवनाला तर धोका होतोच, त्यासोबतच पर्यावरणाचा देखील ऱ्हास होतो. तंबाखू उत्पादनामुळे दूरगामी परिणाम करणारी हानी होत आहे.

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ‘आम्हाला तंबाखूची नव्हे तर अन्नाची गरज आहे’ (we need food not tobacco) हे ब्रीद हाती घेतले आहे. याअंतर्गत जे शेतकरी तंबाखूचे उत्पादन घेतात त्यांना पर्यायी पिक पद्धती, त्याचे महत्व पटवून देण्यासाठी वर्षभर जागतिक आरोग्य संघटनेकडून काम केले जाणार आहे. तंबाखूचे उत्पादन न घेता जर अन्य शाश्वत पिके घेतली तर जागतिक अन्न संकटाला देखील हातभार लागेल.

Today’s Horoscope 31 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

जगभरात दरवर्षी 35 लाख हेक्टर क्षेत्र तंबाखू उत्पादनासाठी वाढत आहे. त्यासाठी दरवर्षी दोन लाख हेक्टरवरील जंगल तोडले जात आहे. तंबाखूसाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके आणि खतांचा वापर करावा लागतो. यामुळे जमिनीचा पोत ढासळत आहे. जमिनीचा पोत ढासळल्यामुळे अन्य पिकांच्याही वाढीची क्षमता कमी होते.

भारतात इतर देशांच्या तुलनेत तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. भारतात दरवर्षी तंबाखूमुळे सुमारे आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूला दूर ठेवल्यास भारतीयांच्या आयुर्मानात 20 वर्षांनी वाढ होईल, असा अंदाज या विषयातील अभ्यासक व्यक्त करतात.

तंबाखूमुळे कर्करोग होतो

तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याच्या, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कर्करोग होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 90 टक्के फुफ्फुसाचा कर्करोग आणि इतर कर्करोग होण्याचे कारण हे धूम्रपान आहे. भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे. भारतात 56.4 टक्के स्त्रियांना आणि 44.9 टक्के पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.

तंबाखूमुळे क्षयरोगाचा धोका

क्षयरोग होण्यासाठी देखील तंबाखू अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे. अनेकदा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण तिप्पट आढळते. सिगारेट किंवा बिड़ीचे धूम्रपान जितके अधिक असेल तितका क्षयरोगाचा धोका अधिक वाढतो.

धुम्रपान करणाऱ्यांच्या सोबत राहणेही टाळा

धूम्रपान/ तंबाखूचे सेवन केल्याने अचानक रक्तदाब वाढतो आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे पायाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते. पायात गैंग्रीन होऊ शकते. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्‍यांच्‍या पापुद्र्याला नुकसान पोहोचवते. मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो.

कुटुंबातल्‍या इतर सदस्यांना देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. मूत्रातील निकोटीनच्या पातळीचा अभ्यास केल्यानंतर धक्कादायक परिणाम समोर आले आहेत. एक व्यक्ती दररोज दोन पाकिटे धुम्रपान करीत होती. तिच्यासोबत धुम्रपान न करणारी एक व्यक्ती राहत होती. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासामुळे धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तीला दररोज तीन पाकिटांचा धोका आढळून आला.

तंबाखू / धुम्रपानामुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त बळावते. तंबाखूमुळे रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. धूम्रपान करणारे / तंबाखू सेवन करणारे यांच्यात धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदयरोग व पक्षाघात होण्याचा धोका दोन ते तीन पट अधिक वाढतो.

नपुंसकता, गर्भपाताचाही धोका वाढतो

धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात. याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण बनू शकते. धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते. धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते. त्यामुळे सहनशीलता ढासळते. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते अथवा मूल कमी वजनाचे होते अथवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो.

भारतात ‘कोटपा’चे नियंत्रण

भारतात तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ निर्मिती, विक्री, सेवन यावर प्रतिबंध लावण्यासाठी सन 2003 मध्ये एक कायदा केला. ‘सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पान, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम’ (कोटपा) असे या कायद्याचे नाव आहे. वैधानिक इशारा, निकोटीन, टारचे प्रमाण न देता मालाची निर्मिती, उत्पादन केल्यास दोन ते पाच वर्ष कारावासाची शिक्षा तसेच पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक दंडाची तरतूद यात करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन न करणे, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री न करणे यावर देखील या कायद्याने प्रतिबंध केला आहे. कायदा असला तरी ‘पण लक्षात कोण घेतो…’ अशी अवस्था सध्या सर्वत्र (MPC News Special) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.