MPC NEWS VIGIL : ती 685 वाहने गेली कुठे; वर्षभरात चोरीला गेलेल्या 847 वाहनांपैकी 162 वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यात 847 वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील केवळ 162 वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे न सापडलेली 685 वाहने गेली कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा चोरट्यांनी सुट्टी घेतली नाही. कठोर लॉकडाऊनच्या काळात देखील वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे वाढती वाहनचोरी ही पिंपरी-चिंचवडकरांच्या समोरील गंभीर समस्या बनली आहे.

घराच्या पार्किंगमधून, गर्दीच्या ठिकाणाहून, रस्त्याच्या बाजूला लावलेली. दुकानासमोरून अशा कुठल्याही ठिकाणाहून वाहने चोरीला जात आहेत. कोणत्याही ठिकाणी वाहने सुरक्षित राहिलेली नाहीत. शहराच्या बाहेरच्या वाहनचोरांच्या टोळ्या शहरात येऊन वाहनांची माहिती काढून ती चोरी करून नेत असल्याचे देखील प्रकार घडले आहेत. एका टोळीला गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बुलेट आणि महागड्या दुचाकी जप्त केल्या.

यावर्षी कोरोना साथीचा काळ असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. कठोर लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फक्त पोलीस दिसत होते. विनाकारण कुणी बाहेर फिरताना दिसताच पोलीस विनाकारण फिरणाऱ्याला चोप देत होते. त्यामुळे शहराच्या बाहेरील चोरट्यांना शहरात येता आले नाही. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर या टोळ्या शहरात दाखल होण्याची शक्यता आहे.

शहरातील सराईत आणि भुरटे चोर लॉकडाऊनच्या काळात सक्रिय होते. पोलिसांना चकमा देऊन हे चोर केवळ घराबाहेरच पडले नाहीत तर चक्क वाहन चो-या करून पसार झाले आहेत. एप्रिल महिना वगळता इतर सर्व महिन्यात मोठ्या प्रमाणात वाहन चोरी झाली आहे. एप्रिल महिन्यात आठ वाहने चोरीला गेली आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 847 वाहने चोरीला गेली. त्यातील 162 वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. हे प्रमाण 19 टक्के एवढे आहे. तर 685 वाहने अजूनही बेपत्ता आहेत. नोव्हेंबर महिन्यात 91 वाहने चोरीला गेली असून त्यातील केवळ पाच वाहनांचा पोलिसांना शोध लागला आहे. यावर्षी चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये 746 दुचाकी, 18 तीनचाकी आणि 83 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यातील 137 दुचाकी, 4 चारचाकी आणि 21 चारचाकी वाहनांचा शोध लागला आहे.

मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एक हजार 195 वाहने चोरीला गेली. त्यातील 258 वाहनांचा पोलिसांना शोध लागला. हे प्रमाण 22 टक्के एवढे होते.

यावर्षी वाहनचोरीचे दाखल गुन्हे –

जानेवारी – 107
फेब्रुवारी – 92
मार्च – 64
एप्रिल – 8
मे – 29
जून – 57
जुलै – 57
ऑगस्ट – 90
सप्टेंबर – 123
ऑक्टोबर – 129
नोव्हेंबर – 91

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.