Mumbai : अभिनेता अक्षय वाघमारे व गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता यांचे उद्या ‘शुभमंगल’

एमपीसी न्यूज : करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लग्नांना ब्रेक लागला आहे. याही परिस्थितीत ज्यांना लग्न करायचे आहे ते अगदी लो प्रोफाईल लग्न करत आहेत.  मराठी अभिनेता अक्षय वाघमारे व गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता उद्या (८ मे) मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत.

हा विवाहसोहळा खरंतर २९ मार्च रोजी पार पडणार होता. मात्र, लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत. मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे.

तसे तर युद्धाच्या काळात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न होत असे. ही देखील एक वेगळ्या प्रकारची युद्धजन्य स्थिती आहे असेच म्हणता येईल.

याबद्दल माहिती देताना अक्षय म्हणाला, “आम्ही लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. मला मंगळवारी रात्री पोलिसांकडून परवानगीचा मेल आला. त्यानंतर लगेचच आम्ही ८ मे ही लग्नाची तारीख ठरवली. आम्ही लग्नाची शॉपिंग आधीच करून ठेवली होती. २९ मार्चला लग्न होईल या हिशोबाने आम्ही सगळी तयारी केली होती. त्यामुळे आता फार कष्ट करावे लागणार नाही.”

या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयने सांगितलं. सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील.

अभिनेता अक्षय हा दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते दादा कोंडके यांचा हा नातू आहे. दादांच्या बहिणीचा तो नातू आहे. अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ अशा अनेक मराठी चित्रपटात व ‘ती फुलराणी’ सारख्या मालिकेत काम केलं आहे.

तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.