Mumbai News : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची दुसऱ्यांदा निवड

या निवड प्रक्रियेला आक्षेप घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने न्यायालयात दाद मागितली आहे.

एमपीसीन्यूज : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. गोऱ्हे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, या निवड प्रक्रियेला आक्षेप घेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने न्यायालयात दाद मागितली आहे.

प्रकरण कोर्टात आहे.  त्यामुळे उपसभापतिपदाची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती.त्यावर निवडणूक घेण्याचा सभापतीचा अधिकार आहे. हा अधिकार न्यायालयीन कक्षेत येत नसल्याचे सांगत विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही निवडणूक घेतली.

त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानाने डॉ. गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली.

तर विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीबाबत न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करू, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

कोणत्याही उमेदवाराला उमेदवारीपासून आणि मतदानापासून वंचित ठेवणं चुकीचे आहे. बहुमताच्या जोरावर सभापतींनी उपसभापतिपदाची निवडणूक जाहीर केल्यावरही आम्ही आक्षेप घेतला होता, असे दरेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.