Mumbai News: मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा – बाळासाहेब थोरात

एमपीसी न्यूज – येत्या 31 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत 3 टक्के तर 31 मार्च 2121 पर्यंत 2 टक्के मुद्रांक शुल्क दर सवलतीमुळे सर्वसामान्य, शेतकरी वर्ग यांच्यासह बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले की, सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीकरिता 3 टक्क्यांनी तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीकरिता 2 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

कोविड – 19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते, मात्र राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक आणि विविध संघटना यांच्याकडून मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी महसूल विभागाकडे करण्यात येत होती. राज्य शासनाने याबाबत पुढाकार घेऊन घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे थोरात यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.