Mumbai News : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

एमपीसी न्यूज – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. यावेळी न्यायालयाने 15 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात असं स्पष्ट केलं. आरोप गृहमंत्र्यांविरोधात असल्याने पारदर्शी चौकशी गरजेची असल्याचं न्यायालयाने यावेळी सांगितलं.

दरम्यान परमबीर सिंह यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. परमबीर सिंग यांची याचिका उच्च न्यायालयाने रद्द केली. ‘नियुक्ती किंवा बद्दल्यांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी योग्य त्या व्यासपीठाकडे दाद मागावी. कारण त्यांनी केलेले आरोप हे सेवेशी संबंधित आहेत,’ असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.