Union Budget 2021: ‘हे आत्मनिर्भर नाही, देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट’

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फेसबुक पोस्ट

एमपीसी न्यूज – कोरोनाची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. हे आत्मनिर्भर नाही तर देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत अजित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून कोरोना काळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा या अर्थसंकल्पातही कायम आहे.

कोरोना संकट काळात संघटीत, असंघटीत क्षेत्रातल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असलेल्यांना गावी परतावं लागलं. मैलोनमैल उपाशीपोटी, अनवाणी गावी परतणाऱ्या मजूरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी सरकारनं काय मदत केली, याचा कुठलाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही.

_MPC_DIR_MPU_II

अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्र्यांनी असंघटीत मजूरांसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली. परंतु, गेल्या काही वर्षांपासून देशातील बेरोजगारांचे सर्वेक्षण बंद आहे. बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली जात नाही, त्याबाबतही ठोस घोषणा होण्याची गरज होती.

महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही. प्राप्तीकर उत्पन्न मर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा असलेल्या मध्यमवर्गीयांच्या भावना संतप्त आहेत.

देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रुपये, तर नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कारण येथील निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी तरतूद केल्याचे या घडीला तरी दिसून येत नाही. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून भरीव काहीही मिळाले नाही. यामुळे महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे, असेही पवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.