Mumbai : बीपीओ कर्मचारी सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणी आरोपींना फाशी ऐवजी जन्मठेप

शिक्षेच्या अंमलबजावणीस विलंब झाल्यामुळे फाशी रद्द

एमपीसी न्यूज- पुण्यामध्ये 2007 मध्ये बीपीओ कर्मचारी ज्योतीकुमार चौधरी यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी असलेल्या दोन आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुणे न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. 

या घटनेतील दोन आरोपी कॅबचालक पुरुषोत्तम बोराडे आणि प्रदीप कोकडे या दोघांच्या फाशीची अंमलबजावणी व्हावी असा आदेश १० एप्रिल २०१९ रोजी पुणे सत्र न्यायालयाने काढला होता. त्यानुसार दोघांना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार होती. दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन फाशीची शिक्षा रद्द करण्याची विनंती केली. या अपिलात त्यांनी म्हटले होते की, या दोघांनी राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे दयेचा अर्ज सादर केला होता. मात्र या अर्जावर निर्णय घेण्यासाठी खूप उशीर करण्यात आला.

उच्च न्यायालयाने 2015 मध्ये या दोघांची फाशीची शिक्षा कायम केली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी 2017 मध्ये या दोघांचा दयेचा अर्ज फेटाळला होता. या अपिलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने दोघांची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, 1 नोव्हेंबर 2007 मध्ये ज्योतीकुमार चौधरी या बीपीओ कर्मचारी महिलेवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. ज्योती मुळची गोरखपूरची होती. ऑफिसमध्ये जाण्यासाठी ती कंपनीच्या गाडीत बसली. त्यानंतर पुरुषोत्तम बोराडे या कॅबचालकाने वाटेत आपला मित्र प्रदीप कोकडे याला आपल्या गाडीत बसवले. या नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि मग तिचा खून केला. ज्योतीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गहुंजेत आढळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.