Pune : कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात’ ट्राईब छत्री’

मेळघाटचे कोरकू दांपत्य आणि पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- 680 भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राईब छत्री’ नावाने फ्रांचायझी आउटलेट चे उदघाटन शनिवारी सायंकाळी मेळघाटचे कोरकू दांपत्य बाजीराव कासदेकर, रिमाय बाजीराव कासदेकर आणि पूर्वांचलच्या विद्यार्थिनीं मायसिलीन, चिची, मंजू, अफेन, आचीन यांच्या हस्ते झाले.

यावेळी ए. के.पंडया ( डेप्युटी मॅनेजर, ट्रायफेड ), पवन सोरेन (सिनीयर असिस्टंट ऑफिसर, ट्राईब इंडिया ),छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे, संतोष महाडिक उपस्थित होते. ‘भारतीय आदिवासी जीवनशैली’ आणि ‘ बालमुद्रा ‘ या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे आणि सौ पूर्वा परांजपे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार मान्यताप्राप्त हे दालन पुण्यात सुरु झाले. येथे या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था आहे . केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या मान्यतेचे अशा स्वरूपाचे हे महाराष्ट्रातील पहिले फ्रँचायझी आउटलेट आहे.

कपडे, किचन मधील वस्तू, कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू,शिल्पे,चित्रे ,भेट वस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश आहे. देशाच्या विविध राज्यातील आदिवासींकडून या वस्तू मागविल्या आहेत.आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान,कोरकू, माडिया, गोंड अशा आदिवासी जमातींचा त्यात समावेश आहे.

केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘ट्रायबल को ओपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया'(ट्रायफेड) आणि ‘ट्राइब्ज इंडिया’ च्या मान्यतेने हे केंद्र पुण्यात फ्रँचायझी आउटलेट म्हणून सुरु झाले आहे.देशातील आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरु होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. भावी काळात आदिवासी ज्ञानविषयक हे ‘ नॉलेज सेंटर ‘ म्हणून विकसित करणार असून ‘ ट्रायबल फूड ‘ देखील उपलब्ध करून देणार असल्याचे श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे यांनी सांगितले.

पुण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पर्वती ला भेट देण्याची सवय लक्षात घेता पर्वती पायथा येथील महिला मंडळाच्या जागेत हे केंद्र सुरु करण्यात आले असून त्याची सजावट आदिवासींमधील वारली, गोंड चित्रकारांनीच केली आहे. या केंद्राच्या डिझाईनमध्ये संतोष महाडिक ( स्मार्ट डिझाईन स्टुडिओ) यांनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.