Talegaon Dabhade : इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील पुल सुस्थितीत ; पुलाला तडा गेल्याची जोरदार अफवा

ग्रामस्थांनी काळजीपोटी केली वाहतूक बंद

एमपीसी न्यूज- इंदोरी मावळ येथील नवीन पुलाला तडा गेला असून,पूल वाहतुकीस धोकादायक असल्याची जोरदार अफवा पसरल्यामुळे इंदोरी परिसरातील ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधीनी सुरक्षितता म्हणून हा पुल वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा चुकीचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

इंदोरी मावळ येथील तळेगाव चाकण बाह्य मार्गावर इंद्रायणी नदीवर २००५ साली हा पुल बांधण्यात आला होता. अंदाजे १०५ मीटर लांबीचा हा पूल असून या पुलावरून जड वाहनांची वाहतूक मोठया प्रमाणात होते. या पुलाला तडे गेल्याचा मेसेज सोशल मीडियावरून शनिवारी (दि.२७) व्हायरल झाल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या पुलाची शनिवार रात्री पाहणी करण्यात आली. रविवारी सकाळी 8 वाजता घटनास्थळी नायब तहसीलदार वडगाव मावळ, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राजेंद्र रहाणे ,कार्यकारी अभियंता सी टी नाईक, सहायक अभियंता उपविभाग वडगाव मावळ राकेश सोनावणे, पोलीस प्रशासन, इंदोरी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य ,ग्रामस्थ यांनी पाहणी केली. यामध्ये सदर पुलाला तडा गेलेला नसून पूल बांधणी करताना त्यामध्ये ठेवलेल्या ‘विस्तारित संयुक्त’ जागेमध्ये असलेली रबरी पट्टी निघाल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा पूल सुस्थितीत असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. ही पट्टी लवकरात लवकर बसविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिका-यांनी सांगितले. त्यानंतर या पुलावरील वाहतूक सुरु करण्यात आली.

मात्र, या प्रकारामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे 12 तास बंद ठेवण्यात आली होती. चाकण पासून वडगाव फाट्या पर्यंत शेकडो गाडया उभ्या होत्या. पर्यायी व्यवस्था म्हणून वाहतूक वडगाव पासून जुन्या पुणे – मुंबई महामार्गे वळविण्यात आली होती.

या घटनेबाबत बोलताना मावळचे तहसीलदार रणजित देसाई म्हणाले, ” इंदोरी येथील इंद्रायणी नदी वरील पुलाला तडा गेला आहे अशी प्राथमिक माहिती समजली.त्यावर चौकशी केली असता पुला वर सोडलेल्या ‘विस्तारित संयुक्त’ जागे मधील रबरी पट्टी पडल्याचे समजले. परंतु रात्री तपास करणे शक्य नसल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.