Talegaon Dabhade : समाजकार्यासाठी सद्गुणी माणसांची गरज- हभप नितीन महाराज काकडे

एमपीसी न्यूज- कोणत्याही सामाजिक संस्थेकडून समाजकार्य होण्यासाठी संस्थेकडे सद्गुणी माणसांची गरज असते. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीकडे अशी 53 माणसे आहेत. त्यामुळे या क्लबकडून भरीव समाजकार्य घडेल असा विश्वास श्री विठ्ठल परिवार मावळचे अध्यक्ष, कीर्तनकार हभप नितीन महाराज काकडे यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या पदग्रहण समारंभात काकडे यांना यावर्षीचा ‘रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवार्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षपदी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे यांची तर सचिवपदी दशरथ जांभूळकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी जिल्हा माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी जिल्हा 3131चे सहाय्यक प्रांतपाल डाॅ महेश कुदळे उपस्थित होते. यावेळी क्लबचे संस्थापक संतोष खांडगे, माजी अध्यक्ष शंकर हदिमनी, सुदाम दाभाडे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे सह आजी- माजी रोटरी अध्यक्ष, सदस्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनी उपस्थित होती.

उपस्थित मान्यवरांनी पदग्रहणाची शपथ दिली. यावेळी क्लबचे संस्थापक संतोष खांडगे यांना रोटरी फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ‘मेजर डोनर 2018-19 हा बहुमूल्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. परग्रहण समारंभाचे औचित्य साधून ‘रोटेल हे बुलेटीन ” मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी रोटरी दत्तक योजनेअंतर्गत स्वामी विवेकानंद शाळेतील सहा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा धनादेश मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पवना प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यसाठीचा धनादेश मुख्याध्यापक ढमढेरे व पर्यवेक्षक काळे यांचेकडे देण्यात आला.

नितीन महाराज काकडे पुढे म्हणाले, ” ‘कनेक्ट द वर्ल्ड’ हे रोटरीचे ब्रीदवाक्य आहे तर ‘हे विश्वची माझे घर’ संतांचे वचन आहे. दोघांचा उद्देश एकच तो म्हणजे समाजाला मार्गदर्शन करणे, त्यांच्या उन्नतीसाठी झटणे. कोणत्याही सामाजिक संस्थेकडून समाजकार्य होण्यासाठी संस्थेकडे उद्योगी, साहसी, धैर्यशील, बुद्धिमान, शक्तिवान, पराक्रमी अशा सहा प्रकारच्या माणसांची गरज असते. अशामुळे ईश्वराचे साह्य होत असते. तेथे काहीच कमी पडत नाही. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीकडे अशी 53 माणसे आहेत. त्यामुळे या क्लबकडून भविष्यात भरीव समाजकार्य घडेल, याबद्दल शंका नाही ”

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश काकडे यांनी अध्यक्षीय कारकिर्दीत हॅप्पी स्कूल, हेल्थ चेकअप, पाणी अडवा-पाणी जिरवा. असे समाजभिमुख प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले. रोटरीचे कार्य मी सर्व पदाधिकारी व सदस्यांना बरोबर घेऊन समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा विशेष प्रयत्न करणार असे ते म्हणाले. यावेळी प्रमोद जेजुरीकर, दशरथ जांभूळकर आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

मावळते अध्यक्ष शंकर हादिमणी यांनी आपल्या प्रास्ताविकात सन 2018- 19 या वर्षातील कार्यपुर्तीचा आढावा सादर केला. यावेळी 25 सदस्यांची 2019-20 वर्षासाठी कार्यकारणी निवडण्यात आली. सूत्रसंचालन संतोष खांडगे,सविता नाणेकर, अनिल धर्माधिकारी यांनी केले. आभार सुमती निलवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.