Mumbai : दीपिकाच्या कच्च्या कैरीच्या पोस्टवरुन चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज : चित्रविचित्र पोशाख आणि अतरंगी स्टाईल्समुळे चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे रणवीरसिंग आणि आपल्या अदांनी आणि मनमोहक हास्याने रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. या जोडीला ‘दीपवीर’ असे कौतुकाने संबोधिले जाते. सध्या लॉकडाउनचा फटका मनोरंजन सृष्टीलाही बसला असून चित्रीकरणाचे सर्वच काम ठप्प आहे. अनेक कलाकारांप्रमाणे दीपिका आणि रणवीरही घरीच बसूनच आहेत. असं असलं तरी ते सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, दीपिकाने नुकत्याच पोस्ट केलेल्या कच्च्या कैरीच्या एका फोटोवरुन या दोघांकडे गोड बातमी आहे का, असा प्रश्न या चाहत्यांना पडला आहे.

१४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या दोघांचे लग्न झालं. त्यानंतर अनेक ठिकाणी हे दोघे आपआपल्या वेळापत्रकाप्रमाणे चित्रीकरणासाठी, पुरस्कार सोहळ्यांसाठी फिरताना दिसले. त्यामुळेच आता या लॉकडाउनच्या निमित्ताने दोघांना एकमेकांबरोबर बराच वेळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. या काळात ते काय करतात याची माहिती ते आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरुन देतात. अनेकदा हे दोघे त्यांच्या सकाळच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात.

दीपिकाने नुकताच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काय बरं आहे, या फोटोमध्ये तर त्यात आहे तिखट, मीठ टाकलेल्या कच्च्या कैरीच्या फोडी दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना दीपिकाने “हे सर्वात उत्तम आहे. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा हे सर्वोत्तम आहे. आजपर्यंत मला भेटलेल्या सर्व गोष्टींमध्ये ही सर्वोत्तम गोष्ट आहे,” असं कॅप्शन दिलं आहे.

मग काय चाहत्यांनी लगेच या बातमीला आपले जोरदार तिखटमीठ लावून वाचकांना खाद्य पुरवले. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये हिरॉईन कैरी खाताना दिसली की प्रेक्षक समजून जात की ती ‘आई’ होणार आहे. दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये कापलेल्या कैरीच्या फोडी दिसत आहेत. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन कच्ची कैरीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे.

यामध्ये अगदी श्रद्धा कपूर, अमृता सुभाष या कलाकारांचा समावेश आहे. मात्र, सुतावरुन स्वर्ग गाठावा त्याप्रमाणे काही चाहत्यांनी या फोटोचा संबंध थेट दीपिका आणि रणवीर लवकरच काहीतरी गोड बातमी देणार असल्याशी लावल्याचे कमेंटमधून दिसत आहे. दीपिका आणि रणवीरची मैत्रिण असणारी भावना जसरा हिनेही कमेंट करुन, “तुम्ही एकदम फिल्मी स्टाइलमध्ये गोड बातमी देत आहात का?” असा सवाल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.