Pimpri News : महापालिका अग्निशमन दलासाठी सात वाहने खरेदी करणार

एमपीसी न्यूज – आपत्कालीन वर्दीसाठी अग्निशमन दल सुसज्ज व दक्ष असावे, याकरिता अग्निशमन दलासाठी  फायर टेंडर, फ्लड रेस्क्यू व्हॅन, बीए सेट व्हॅन, फायर फायटिंग मोटार बाईक अशी एकूण सात वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहन खरेदी करण्यासाठी 9 कोटी 53 लाख 62 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

महापालिकेचा अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेचा आणि अत्यंत संवेदनक्षम विभाग आहे. शहरातील नागरिकांची जीवित आणि वितहानी वाचविण्याचे जोखमीचे कामकाज अग्निशमन विभागामार्फत 24 तास केले जाते. अग्निशमन विभागाचा व्याप अग्निशमन आणि वर्दी संख्या कार्यालयीन कामकाज, बाहेरील नागरिकांची दिवसेंदिवस होणारी ये-जा, शहराचे झपाट्याने होणारे शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या, वाहन, पार्किंगची समस्या अशा विविध समस्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ 177 चौरस किलोमीटर एवढे आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्यांबरोबर दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभा राहत आहेत. शहरातून पवना, मुळा, इंद्रायणी या तीन नद्या वाहतात. महापालिका अग्निशमन दलाचे संत तुकारामनगर पिंपरी येथे मुख्य केंद्र असून ठिकठिकाणी उपकेंद्रे आहेत.

शहरात एखादी दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तहानी वाचविणे, आपत्कालीन व्यवस्थापन करणे, अग्निशमन, अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, पावसाळ्यात पूरपरिस्थिती ओढावल्यास पूरनियंत्रण आणि बचावकार्य करणे आदी विविध कर्तव्ये पार पाडावी लागतात. 24 तास अग्निशमन सेवा पुरवावी लागते.

लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यापासून घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरची गळती झाल्यास ती रोखणे, विहिरीत किंवा नदीत बुडालेल्यांना बाहेर काढणे यासारख्या आपत्कालीन वर्दींसाठी अग्निशमन दलाला सतत सुसज्ज व दक्ष रहावे लागते. त्यासाठी अत्याधुनिक बचाव, सुरक्षा साधनांची गरज भासते. याच अनुषंगाने महापालिका अग्निशामन दलासाठी फायर टेंडरचे सहा हजार लिटर क्षमतेचे दोन नग, फ्लड रेस्क्यू व्हॅन, एक नग बीए सेट व्हॅन आणि फायर फायटिंग मोटार बाईक तीन अशी एकूण सात वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.

ही वाहने अग्निशमन विभागाच्या वापरासाठी खरेदी केली जाणार असल्याने त्यांचा अभिप्राय घेणे गरजेचे आहे. त्यानुसार अग्निशमन विभागाने सर्व वाहनांचे तांत्रिक स्पेसिफिकेशन केले आहे. या वाहनांचे अंदाजपत्रकीय दरही अग्निशमन विभागाने दिले आहेत. तरतूद याच विभागाची असून वाहने खरेदीसाठी 9 कोटी 53 लाख 62 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विभागाकडे सन 2021-22 साठी 21 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यानुसार वाहन खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.