Pimpri News : महापालिका शहरात 34 ठिकाणी उभारणार ओपन जिम

व्यायामाच्या साहित्यासाठी पावणेतीन कोटी खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात 34 ठिकाणी ओपन जिम उभारण्यात येणार आहे. या जिमसाठी चार पुरवठादारांकडून वेगवेगळे व्यायामाचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 82 लाख रुपये खर्च होणार आहे.

महापालिकेच्या शहरात 86 व्यायामशाळा आहेत. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या वर्गानुसार व्यायाम शाळांचे धोरण तयार करण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने, मैदान, पदपथ अशा ठिकाणीही ओपन जिम ही संकल्पना राबवली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या ओपन जिमचा लाभ घेतात.

महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आवश्यकतेनुसार विविध ओपन जिमसाठी साहित्य पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. शहरात एकूण 34 ठिकाणी या ओपन जिम उभारण्यात येणार आहेत. या ओपन जिमसाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक वर्ष कालावधी करिता इच्छुक पुरवठादारांकडून दर करार पद्धतीने निविदा मागविल्या. त्यानुसार 19 निविदा प्राप्त झाल्या.

पात्र ठरलेल्या निविदांपैकी प्राप्त लघुत्तम पुरवठादार पुण्यातील एड्युनिडस यांनी तीन बाबी साहित्यासाठी 80 लाख 81 हजार रुपये दर सादर केला. पुणे येथील त्रिमूर्ती इंजिनीअरिंग यांनी चार बाबींसाठी 86 लाख 93 हजार रुपये लघुत्तम दर सादर केला. ठाणे येथील बाबा प्ले वर्ल्ड यांनी तीन बाबींसाठी 53 लाख 74 हजार रुपये इतका दर सादर केला. ठाणे येथील हनी फन एन थ्रिल कंपनी यांनी 59 लाख 89 हजार रुपये लघुत्तम दर सादर केला.

या चार पुरवठादारांनी एकूण 13 बाबींसाठी 2 कोटी 81 लाख 39 हजार रुपये दर सादर केले. हे दर निविदा दरापेक्षा कमी असल्याने स्वीकृत करण्यात आले. या चारही पुरवठादारांसमवेत करारनामा करून विविध ओपन जिम साहित्य खरेदी करण्यासाठी पुरवठा आदेश देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.