Talegaon News: पूर्ववैमनस्यातून चहा व्यावसायिक तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – चहा व्यावसायिक तरुणावर पाच जणांनी भर दिवसा खुनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी कोयता आणि तलवारीने तरुणावर सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी तीन वाजता तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात घडली.

सुरज नितीन टेकवडे (वय 28, रा. तळेगाव दाभाडे) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगेश हिरे आणि त्याचे चार साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टेकवडे तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात चहाचा व्यवसाय करतात. मंगळवारी दुपारी तीन वाजता आरोपी टेकवडे यांच्या चहाच्या दुकानात आले. आरोपी मंगेश आणि फिर्यादी टेकवडे यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी कोयता आणि तलवारीने टेकवडे यांच्यावर सपासप वार केले. त्यात टेकवडे यांच्या मानेवर, हातावर, पायावर, पाठीवर गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर आरोपींनी टेकवडे यांच्या चहाच्या दुकानासमोर दहशत निर्माण केली आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.