Nashik Corona Vaccine : जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ७५४ जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – कोरोना लसीच्या अपप्रचाराला बळी न पडता जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ७५४ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली आहे. लसीकरणाचा टक्का हळूहळू वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. लसीकरणाचा टक्का ८० टक्यांवर पोहचला आहे…

जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या अतिदक्षतेमुळे जिल्ह्यात कोरोना उतरणीला लागला आहे. लसीकरणाच्या मोहीमेने जिल्ह्यात वेग घेतला असल्याचे पहायला मिळते. मागील १६ जानेवारीला लसीकरण मोहीमेला प्रारंभ झाला.

सर्वात प्रथम आरोग्य सेवकांची नोंदणी करुन त्यांना लस देण्यात आली. मात्र, लसीबाबत अपप्रचार व भितीमुळे पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा वेग जेमतेम ५६ टक्के इतका होता. सोशल मीडियाद्वारे लसीच्या दुष्परिणामाबाबत खोटी माहिती पसरवली जात होती. त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचार्‍यांनी लस टोचून घेण्यास नापंसती दाखवली होती.

मात्र, लस घेतल्यानंतर कोणताही दुष्परिणाम होत नाहि याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. स्वत: प्रशासकीय अधिकार्‍यांनी लस टोचून घेत पाॅझिटिव्ह संदेश पोहचवला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.लीना बनसोड यांनी लस घेतली.

त्याची परिणिती म्हणजे उशीराने का होइना हळूहळू लसीकरणाचा टक्का वाढत असल्याचे सुखदायक चित्र पहायला मिळत आहे. लस देण्यासाठी ३३ हजार ६२० जणांची नोंदणी करण्यात आली होती.

त्यापैकी आतापर्यंत २६ हजार ७५४ लाभार्थ्यांनी लस टोचून घेतली आहे. तर सहा हजार ८६६ लाभार्थ्यांनी लस घेण्यास नापसंती दर्शवली. त्यात १११ गरोदर मातांचा समावेश आहे. लस घेतल्यानंतर ७१ जणांना तीव्र तर १४७ जणांना सौम्य लक्षणे जाणवली.

दरम्यान आरोग्य कर्मचार्‍यानंतर सध्या दुसर्‍या टप्प्यात पोलीस व प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांना लस दिली जात आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने प्रशासन‍ाचे नियोजन सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.